शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
मंत्री ऊर्जा विभाग / कृषी सौर पंप योजना प्राधिकरण मंत्रालय,मुंबई महाराष्ट्र शासन व प्रधान सचिव ऊर्जा विभाग / कृषी सौर पंप योजना प्राधिकरण मंत्रालय,मुंबई यांना,”कृषी पंप सौर योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासंबंधाने उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदन दिले आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,”कृषी सौर पंप योजना प्रकरणाततंर्गत अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली असताना त्यांना सौर ऊर्जा कृषी पंप देणे संबंधाने संबंधित विभागाकडून होत असलेले गंभीर दुर्लक्ष,त्यांच्यातील निष्क्रीयता दर्शविते आहे.
चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आज ज्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे,ती केवळ प्रशासकीय अधिकाऱ्यांचा केवळ हलगर्जीपणा नव्हे,तर शेतकऱ्यांवर थेट अन्याय करणारा कार्यभाग आहे.
सौर उर्जा कृषी पंप शेतकऱ्यांना देण्यास होणारा विलंब शेतकऱ्यांच्या सहनशीलतेची उघडपणे केलेली थट्टा आहे.या गंभीर स्थितीकडे आपले तात्काळ लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करीत आहे असे उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित प्रधान सचिव यांना उपसरपंच अशोक चौधरी यांनी म्हटले आहे.
कृषी सौर पंप योजने अंतर्गत चिमूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी अर्ज केली आहेत,कागदपत्रांची पूर्तता केली आहे,जागा तपासणी झाली आहे,शुल्क भरणा केला आहे,इत्यादी सर्व टप्पे नियमानुसार आणि वेळेत पूर्ण केले आहेत.
परंतु,आजपर्यंत,ना मंजुरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,ना स्थापनेचे वेळापत्रक दिले आहे,ना एकही स्पष्ट,अधिकृत किंवा पारदर्शक उत्तर मिळाले आहे.हा विलंब कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरण्याजोगा नाही असेही उर्जा मंत्र्यांच्या व प्रधान सचिवांच्या लक्षात उपसरपंच अशोक चौधरी यांनी आणून दिले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की,त्यांनी गेल्या अनेक महिन्यांत विद्युत विभागाशी दूरध्वनीवर व प्रत्यक्ष भेटून सौर उर्जा कृषी पंप बाबत चर्चा केली.
तसेच लेखी पत्रव्यवहाराद्वारे सातत्याने पाठपुरावा केला.मात्र, मिळालेले उत्तर हे टाळाटाळ करणारे,दिशाभूल करणारे,जबाबदारीपासून पळवाट काढणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पूर्ण उदासीनता दाखविणारे दिसून आले.यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांच्या वागणूकीवर व जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उभे करते असेही निवेदनात नमूद केले आहे.
शेतकरी रोज ग्रामपंचायतीकडे स्पष्टीकरण मागत आहेत,परंतु विभागाकडून कोणतीही अद्ययावत लेखी माहिती न मिळाल्याने त्यांना योग्य मार्गदर्शन देणे अशक्य बनले आहे.कृषी सौर पंप योजना ही शेतकऱ्यांच्या सिंचनाची जीवनवाहिनी असताना,अशा प्रकारचे दुर्लक्ष हे केवळ निष्क्रीयता नसून,शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळ करणारी गंभीर प्रशासकीय चूक आहे याबाबत उपसरपंच अशोक चौधरी यांनी गृहमंत्री तथा प्रधान सचिव यांच्या लक्षात आणून दिले आहे.
आवश्यक मागण्या…
१. चिमूर तालुक्यातील सर्व प्रलंबित कृषी सौर पंप अर्जाची तात्काळ पुनर्रतपासणी करून, जाणीवपूर्वक अथवा निष्काळजीपणामुळे काम रोखून धरणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट, नामनिर्दिष्ट कठोर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी.
२. ग्रामपंचायतीकडे तात्काळ अधिकृत लेखी स्वरूपात प्रगती अहवाल,मंजुरी यादी,तांत्रिक तपशील, तसेच पुढील कार्यवाहीचे वेळापत्रक उपलब्ध करून द्यावे.
३. संपूर्ण प्रक्रियेसाठी स्पष्ट,बंधनकारक आणि वेळमर्यादाचे काटेकोर पालन करणारे वेळापत्रक जाहीर करून.त्याची प्रत संबंधित शेतकऱ्यांना द्यावी.
४. या प्रकरणातील अनियमितता,विलंब आणि अधिकारी वर्गाच्या उदासीनतेमागील कारणे शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी नेमावी आणि त्याचा अहवाल सार्वजनिक करावा.
शेतकऱ्यांच्या भविष्याचा,पिकाच्या हंगामाचा आणि उत्पन्नाचा थेट संबंध या योजनेशी आहे.त्यामुळे त्वरित,निर्णायक,स्पष्ट आणि कठोर कार्यवाही करणे अत्यावश्यक आहे असे मत उपसरपंच अशोक चौधरी यांची आहे.यामुळे आपण या संदर्भात तातडीने हस्तक्षेप कराल,याबाबत आम्हाला पूर्ण विश्वास आहे असेही निवेदनकर्त्याचे म्हणणे आहे.



