दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी – महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन संतभूमीला विनम्र अभिवादन केले. समाधी परिसरात त्यांच्या आगमनानिमित्त भक्तीपूर्ण आणि श्रद्धामय वातावरण पाहायला मिळाले.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी समाधीसमोर नतमस्तक होत माऊलींच्या अध्यात्मिक परंपरेचे स्मरण केले. यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड.राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील आणि ॲड.रोहिणी पवार यांनी राज्यपालांचे स्वागत करून संस्थानाच्या कार्याचा आढावा दिला.
विश्वस्तांनी राज्यपालांना आळंदी देवस्थानच्या सेवाभावी उपक्रमांची, वारकरी व्यवस्थापनाची आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. वारकरी परंपरेची व्याप्ती, लाखो भाविकांची श्रद्धा आणि संतसाहित्याची परंपरा यावरही त्यांच्या समक्ष विशेष माहिती ठेवण्यात आली.
राज्यपालांच्या भेटीमुळे समाधी परिसरात विशेष सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शनानंतर आचार्य देवव्रत यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानपरंपरेचे आणि वारकरी संप्रदायाच्या महान योगदानाचे कौतुक केले.



