खासदार सुनिल मेंढे यांच्या धान विषयक मागण्यांवर बैठकीत सकारात्मक चर्चा….. — धान खरेदी केंद्र जुन्याच निकषा नुसार चालू होणार….

प्रितम जनबंधु

  संपादक 

भंडारा :- दोन दिवसांपूर्वी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध विषयांना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करीत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करणाऱ्या खासदार सुनील मेंढे यांच्या मागणीला यश आले आहे. आज मुंबई येथे सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे जुन्याच निकषाप्रमाणे धान खरेदी केंद्र सुरू होतील असे सांगण्यात आल्याने खासदारांची शिष्टाई व पुढाकार धान शेतकऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे.

              भंडारा आणि गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. येथील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ही धान्य विषयाभोवतीच फिरत असते. त्यामुळे धान या विषयाला घेऊन होणारे नुकसान आणि येणाऱ्या अडचणी शेतकऱ्यांना चिंताग्रस्त करून सोडतात. धान उत्पादकांच्या अशाच काही विषयांना घेऊन खासदार सुनील मेंढे यांनी दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिले होते. 

                  सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अवकाळी झालेल्या पावसाने दोन्ही जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, त्यामुळे योग्य ती भरपाई देण्यात यावी. धान खरेदी केंद्र सुरू करताना असलेल्या जाचक अटी काढून धान खरेदीत सुसूत्रता येण्यासाठी योग्य पद्धती निश्चित करून केंद्र सुरू करावे, आधारभूत किंमत अल्प असल्याने प्रतिक्विंटल सातशे रुपये बोनस देण्यात यावा, तसेच केंद्र चालकांच्या गोदामाचे भाडे आणि अन्य असलेले देणे त्वरित द्यावे अशा अनेक मागण्या या पत्रातून खासदार सुनील मेंढे यांनी शासनाकडे केल्या होत्या.

            दरम्यान आज धान या विषयाला घेऊन मुंबई येथे महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला खासदार स्वतः आज उपस्थित होते. या बैठकीत खासदारांनी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने चर्चाही झाली. धान खरेदी केंद्र जुन्याच निकषांप्रमाणे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे जाचकअटींचा खासदारांचा विषय मार्गी लागला आहे. धान खरेदी केल्यापासून धानाचे चुकारे 15 ते 30 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे सांगण्यात आले. 

                  अनियमितता करणाऱ्या धान खरेदी केंद्रांवर कारवाई करण्याचे तसेच केंद्र संचालकांकडे थकीत असलेले पैसे त्वरित शासनाकडे जमा करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे बैठकीत धान खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थांनाही दिलासा मिळाला. आधीप्रमाणेच एक टक्का घट ग्राह्य धरून खरेदी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. 

                     खासदारांच्या अन्य मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन यावेळी दिले गेले. खासदारांनी केलेल्या मागण्यांवर शासनाने घेतलेली सकारात्मक भूमिका खासदारांचे प्रयत्न फळास आल्याचे सांगणारे आहेत.

             यावेळी बैठकीला प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, डॉ. विजयकुमार गावित, धर्मरावबाबा आत्राम, खा अशोक नेते, डॉ परिणय फुके, आ विजय रहांगडाले, आ विनोद अग्रवाल, आ मनोहर चंद्रिकापुरे, आ राजु कारेमोरे, आ आशिष जयस्वाल, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार बाळा काशिवार आदी नेते तसेच जिल्हाधिकारी भंडारा योगेश कुंभेजकर, जिल्हाधिकारी गोंदिया चिन्मय गोतमारे उपस्थित होते.