Home Social सायकल बँक योजनेमुळे मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

सायकल बँक योजनेमुळे मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरशिहपुर प्रतिनिधी

        पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. ‘सायकल बँक’ ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारी आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना शाळेत जाणे सोपे होईल.प्रवासाचा त्रास कमी होईल. तसेच, नियमित हजेरीत वाढ होईल. शिक्षणाच्या प्रवाहात कोणतीही मुलगी मागे राहू नये, यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल.

         जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी व्यक्त केले.

         ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. या प्रवासामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होते. तसेच शिक्षणात अडथळे निर्माण होतात. या समस्येवर मात करून त्यांची शाळेत नियमित उपस्थिती वाढावी.

          तसेच, प्रवासाचा त्रास कमी व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीच्या वतीने ‘सायकल बँक’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा कृषी मंत्री भरणे यांच्या हस्ते इंदापूर येथे संपन्न झाला. त्या वेळी ते बोलत होते.

          या प्रसंगी इंदापूर तालुक्यातील पाचवी ते आठवीच्या वर्गातील १११ विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. सायकल मिळाल्याने विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण होते.

         कार्यक्रमाला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पंचायत समिती इंदापूरचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच लाभार्थी उपस्थित होते.