Home Social “जागृत ग्राहक राजा,चा नवीन उपक्रम “संघटना आपल्या दारी”… — मूल तालुक्यातील...

“जागृत ग्राहक राजा,चा नवीन उपक्रम “संघटना आपल्या दारी”… — मूल तालुक्यातील समस्याग्रस्त रामपूरला दिली पदाधिकाऱ्यांनी भेट!..

      रामदास ठुसे 

नागपूर विभागीय प्रतिनिधी…

    जागृत ग्राहक राजा या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने अक्षयतृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती दिनी “संघटना आपल्या दारी” हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमाची सुरुवात मूल शहरात समाविष्ट मौजा रामपूर,प्रभाग क्रमांक १ वार्ड क्रमांक १ येथून करण्यात आली आहे.

    या उपक्रमाअंतर्गत दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत यांच्या नेतृत्वाखाली मूल तालुका पदाधिकारी यांनी रामपूर येथे तब्बल तीन किलोमीटर अंतरावरून मूल शहराला वळसा घालून चिंचोली मार्गे पोहोचत अभियानाचा लोकहितासाठी सदोपयोग केला.

      मौजा रामपूर मूल शहराचा एक प्रमुख भाग बनला असला तरीही येथे जाण्यासाठी बारमाही पक्का रस्ता नाही,आजतागायत मूल तळ्याच्या पाळी ने या गावात जनता येजा करायची,परंतू शहरीकरण होत मूल शहर मौजा विहिरगाव,चंद्रपूर मार्गे होत आज रामपूर पर्यंत जाऊन पोहोचले आहे.

      मूल शहराचा विकास आराखडा तयार करताना मौजा रामपूर पर्यंत नवीन रस्ते बनविताना अर्धा किलोमीटर अंतरावरील मौजा रामपूर येथे जाण्यासाठी जास्तीत जास्त दोनशे मिटर पक्का रस्ता तयार करणे आवश्यक होते परंतू नगरप्रशासनाच्या दुर्लक्षित पणामुळे नवीन वस्तीत चांगले सिमेंट काॅंक्रिटचे रस्ते तयार केले गेले मात्र जून्या रामपूर गावाला जाण्यासाठी आजमितीला रस्ताच नाही ही वास्तविकता आहे,नाही म्हणायला मौजा चिंचोली मार्गे शेतशिवारातून एका पांदन रस्त्याचे खडीकरण व उखडलेले डांबरीकरण करुन एक रस्ता तयार करण्यात आला आहे.म्हणजे अर्धा किलोमीटर जाण्यासाठी किमान तीन किलोमीटर फेऱ्या ने जायचे,हा नवीन शोध लावला गेला आहे.

      जागृत ग्राहक राजा या संघटनेचे रमेश डांगरे सचिव यांनी आजच्या या आयोजनाची भुमिका जनतेसमोर ठेवली व संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला तर उपाध्यक्ष अशोक मैदमवार यांनी संघटना कशा पद्धतीने काम करते व ग्राहकांच्या हिताचे निर्णय संवाद समन्वयातून साध्य करण्यासाठी सहकार्य करते ह्याविषयी माहिती दिली,अध्यक्षस्थानावरून सौ.संजना मडावी यांनी ग्रामस्थांच्या अडचणी व त्यांच्या लढ्याची भुमिका विशद केली व जागृत ग्राहक राजा या संघटनेला सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असणार आहोत अशी ग्वाही दिली.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ आनंदराव कुळे यांनी केले.

    याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी मुक्त चर्चा करण्यात आली याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा झाली.त्यात प्रामुख्याने पोच मार्ग आणि जून्या वस्तीत नाल्या बांधकाम केल्या त्या अतिशय अरुंद असून त्यावर झाकण नाही,पाण्याची पाइपलाइन टाकली,परंतू अर्ध्या बाजूची नुसतीच माती ढकलून ठेवली आहे,बुजाई केली नाही,सिमेंटिकरण नाही. लाभार्थ्यांना दोन तीन वर्षांपासून घरकुल मिळत नाहीत,कारण काय तर सिटी सर्व्हे मध्ये नोंद नाही. 

     नगर परिषद वर्षे भरात केवळ दोनदा नाली सफाई करीत असल्याचे नागरिकांशी चर्चेतून पुढे आले. अंतर्गत रस्त्यांचे काही काम अर्धवट पडले आहे त्याकडे कुणाचे लक्ष नाही. 

      राशनचे धान्य आणायला दूरवर मूल शहरात जावे लागते,वेगवेगळ्या प्रमाणपत्रासाठी तहसील कार्यालयात गेल्यावर दाखल्यासाठी मोठी लुट केली जाते यांसारख्या समस्या पुढे ठेवल्या गेल्या.

    जून्या मालगुजारी तलावाच्या पाळीवरुन दूचाकी अथवा सायकलने जातांना खड्ड्यांमुळे अडचणीचे जाते,तसेच तळ्याच्या सांडव्याची(सलंग )संरक्षण भिंत पाण्यामुळे वाहून गेली आहे.

     तसेच तळ्याच्या पाळीवरुन पावसाळ्यात पायी जाणेही कठीण होऊन जाते.अशा एक ना अनेक समस्यांना रामपूर वासीय नित्यनेमाने सामोरे जात असल्याचे नागरिकांशी संवाद साधताना स्पष्ट करण्यात आले.

       याप्रसंगी जागृत ग्राहक राजा संघटनेचे,मूल तालुका पदाधिकारी अशोक मैदमवार उपाध्यक्ष रमेश डांगरे सचिव, डॉ आनंदराव कुळे कार्यकारिणी सदस्य तसेच रामपूर वासीय बचतगट प्रमुख सौ.संजना रविंद्र मडावी,विजय जिडगलवार,राजू मडावी,आर्या मडावी,अल्का मडावी,उषा गुज्जनवार, रंजना मडावी,वनिता मडावी, संगिता मडावी,ज्योती गुज्जनवार,अल्का कोल्हे,लिकेंद्र बनसोड, रोहित जिडगलवार यांचेसह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

     जागृत ग्राहक राजा च्या या संघटना आपल्या दारी अंतर्गत ग्राहक जागृती अभियानाचे गावकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले व ग्राहक हक्कासाठी उभारलेल्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचे व ग्राहक जागृतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.