सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहीले महिला अधिवेशन १० मार्च रोजी आयोजन… 

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्त्री, शुद्र आणि अतिशुद्रांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले यांच्या विचारांचा हा वारसा नवीन पिढीपर्यंत नेण्यासाठी सत्यशोधक समाज संघातर्फे ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित आणि सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त रविवार दिनांक १० मार्च रोजी सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहीले महिला अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सुनीता भगत, सचिव सुरेश झाल्टे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

          यावेळी नायगाव पंचायत समिती खंडाळ्याच्या माजी सभापती शुभांगी नेवसे, संयोजिका उज्ज्वला तांबे, फुले विचारांचे अभ्यासक डॉ.दत्ताजी जाधव आणि प्रा. हेमलता भालेराव आदी उपस्थित होते. 

           हे राज्यस्तरीय पहीले महिला अधिवेशन सावित्रीमाई फुले यांच्या माहेरी म्हणजे नायगाव (खंडाळा), जि. सातारा येथे होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून स्मिता पानसरे, सुजाता गुरव, वासंती नलावडे, दर्शना पवार, नागपूरच्या झेबुनिस्सा शेख उपस्थित राहणार आहे. यावेळी अधिवेशनाच्या अध्यक्षा वंदना बनकर, कार्याध्यक्ष रूपाली इंगोले, संयोजिका उज्ज्वला तांबे, नायगावच्या सरपंच आणि स्वागत समिती प्रमुख साधना नेवसे, स्वागताध्यक्ष शुभांगी नेवसे उपस्थित राहणार आहेत.  

           प्राचीन भारतातील क्रांतीकारी महिला कालांतराने गुलाम का झाली या विषयावर गटचर्चा होणार असून या सत्राचे अध्यक्षस्थान छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध विधीज्ज्ञ ॲड.वैशाली डोळस भूषविणार आहेत. या सत्रानंतर विविध ठराव पारीत केले जाणार आहेत. या अधिवेशनानिमित्त रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी सकाळी ६.०० वाजता ह.भ.प. भोईर महाराज यांचे सत्यशोधकीय किर्तन होणार आहे. या अधिवेशनासाठी विदर्भ, मराठवाडा, खांदेश, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील महिला सहभागी होणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनिवार ९ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० (पाच) वाजता, विराज लॉन, खंडाळा येथे ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग वैशाली धाकुलकर सादर करणार आहेत. यानंतर सावित्रीबाई फुले आजच्या महिलंसाठी दीपस्तंभ या विषयावर प्रबोधनपर कार्यक्रम होणार आहे.

           या अधिवेशनात राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सुनीता भगत, सचिव सुरेश झाल्टे यांनी यावेळी केले.