शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
पळसगांव :- चिमूर तालुकातंर्गत मौजा बोडधा गावातील महिला पिण्याच्या पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झाल्या असल्याने त्यांच्यासाठी पाणी दुर्भिक्ष झाले असल्याचे चित्र आहे.
मागील २ वर्षांपासून सदर ५० कुटुंबातील महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी सातत्याने भटकंती सुरु आहे.सदर भटकंती थांबत नसल्याने मौजा बोडधा येथील महिलांनी घागरी घेऊन चिमूर येथील जलपुरवठा उपविभाग कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.
मागील दोन वर्षांपासून गावातील सुमारे 50 कुटुंबे नळाच्या पाण्यापासून वंचित आहेत.बोडधा येथे दोन वर्षांपूर्वी जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली होती.
ठेकेदाराने पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू केले.मात्र निधीअभावी काम अर्धवट राहून योजना बंद पडली.नवीन योजना सुरू होणार असल्याच्या आश्वासनावर 35 वर्षांपासून सुरू असलेली जुनी पाणीपुरवठा योजना बंद करण्यात आली.
मात्र आजपर्यंत नवीन योजना सुरू न झाल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
ग्रामपंचायत,जलपुरवठा विभाग व संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
अखेर संतप्त महिलांनी घागरी घेऊन जलपुरवठा कार्यालयावर मोर्चा काढत नवीन योजना तातडीने सुरू करावी किंवा जुनी नळ योजना पुन्हा सुरू करावी,अशी मागणी केली.
याबाबत अभियंत्यांना निवेदनही देण्यात आले.या आंदोलनात बोडधा गावातील सुमारे 50 महिला व पुरुष सहभागी झाले होते.



