Home Maharashtra राज्यातील अवैध हाथभट्टी दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई आवश्यक :- हेमंत पाटील… ...

राज्यातील अवैध हाथभट्टी दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई आवश्यक :- हेमंत पाटील… — ‘गावठी’ दारूमध्ये मिथेनॉलचे मरण,राज्यातील मृत्यूचे तांडव चिंताजनक…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक

    पुणे :- राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर हाथभट्टी दारूच्या निर्मिती आणि विक्रीमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून, गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे.या अवैध धंद्यांवर प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी हातोडा मारावा, अशी मागणी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे.केवळ नावापुरती कारवाई करून काही दिवसांनी हे अड्डे पुन्हा सुरू होतात,हा आजवरचा अनुभव आहे.आता ही मलमपट्टी थांबवून राज्यातील अवैध हाथभट्टी दारू अड्ड्यांवर कठोर कारवाई करीत मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत, असे आवाहन पाटील यांनी केले.

     रासायनिक भेसळ आणि घातक मिथेनॉलच्या वापरामुळे महाराष्ट्रात आजवर शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.मे महिन्यात गावठी दारूत मिथेनॉलच्या रासायनिक भेसळीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये मालवणीत मेथिल अल्कोहोलयुक्त दारूमुळे १०२ जणांचा बळी गेला. २००४ मध्ये विक्रोळीतील विषारी दारुमुळे १०४, तर मुंबईतील गोळीबार मैदान परिसरात १९८१ मध्ये ३२५ जणांचा विषारी दारुमुळे मृत्यू झाला होता, याची आठवण पाटील यांनी करून दिली.

      राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) अहवालानुसार,अनेक ग्रामीण आणि शहरी भागांत पोलिसांच्या व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकाखाली हे हाथभट्टीचे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत.रासायनिक प्रक्रियेत अल्कोहोलचे प्रमाण वाढवण्याच्या नादात ‘इथिल’ ऐवजी ‘मिथेनॉल’ तयार होते,जे थेट मृत्यूला आमंत्रण ठरते. स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यंत्रणेच्या छुपे पाठिंब्याशिवाय हे अवैध धंदे चालणे अशक्य असल्याचा थेट आरोप हेमंत पाटील यांनी केला असून,हातभट्टी दारुची विक्री करणार्यांविरोधात विशेष ऑपरेशन सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.