वृत्त-विश्लेषण
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
चिमूर नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात पाणी पुरवठा करताना भेदभाव केला जात असल्याची प्रचंड ओरड गृहिणींची आहे.याचबरोबर नळयोजनांतंर्गत होणारा पाणीपुरवठा हजारो नळ कनेक्शन धारक टिल्लू पंप द्वारे साठवणूक करीत असल्याने बऱ्याच भागतील नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे.
मागील १० वर्षांपासून चिमूर नगरपरिषदेच्या काही भागात नळयोजनेच्या माध्यमातून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने,नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिक म्हणजे चिमूर नगरपरिषदेच्या कारभाराची नाड व नगरपरिषदेच्या विकासाचे केंद्र असले तरी,नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि पदाधिकारी व अधिकारी यांच्या संकुचित विचारसरणीमुळे मोजक्या नागरिकांच्या भोवतालच विकास दिसतो आहे,विशिष्ट लोकांनाच योजनांचा लाभ मिळतो आहे तर पाणीपुरवठा मोजक्या ठिकाणी केंद्रीत होऊ लागला आहे.
भेदभावपुर्ण कार्यपद्धत म्हणजे नगरपरिषदे अंतर्गत गोरगरीब नागरिकांचे शोषण,त्यांच्यावर अन्याय आणि त्यांच्या हक्काचे दमन नव्हे काय?…
मागील १० वर्षांपासून चिमूरकर पाण्यासाठी ओरडत असतांना त्यांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यास नगरपरिषद अयशस्वी ठरत असेल तर त्यांच्याकडे योग्य नियोजनाचा अभाव आहे,असे लक्षात आले आहे.
पाणी हे मानवी शरीर आणि पर्यावरणासाठी जीवन आहे.मानवी शरीराचे वजन सुमारे 60 टक्के पाण्याने बनलेले असते,पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते,पचनक्रिया सुधारते आणि सर्व पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचवते.
जगण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.पाणी डिहायड्रेशन टाळते,ज्यामुळे चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे यासारख्या समस्या दूर होतात.भरपूर पाणी प्यायल्याने लघवीद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात,ज्यामुळे किडनीचे आजार आणि किडनी स्टोनचा धोका टळतो.
नियमित पाणी पिल्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते,अन्नाचे पचन सुरळीत होण्यासाठी आणि बद्धकोष्ठता टाळण्यासाठी पाणी आवश्यक आहे.
पाणी सांध्यांसाठी वंगण म्हणून काम करते,ज्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळतो.दैनंदिन जीवनात,आंघोळ,कपडे धुणे,भांडी घासणे आणि स्वयंपाक करण्यासाठी नागरिकांना रोज शुद्ध पाण्याची गरज असते.
केवळ मानवासाठीच नाही,तर पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि वनस्पतींच्या अस्तित्वासाठी पाणी हा मुख्य स्त्रोत आहे.
भर उन्हाळ्यात चिमूरकरांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने चिमूर नगरपरिषद मुख्याधिकारी,अध्यक्ष,उपाध्यक्ष,पाणि पुरवठा विभागाचे अभियंता,स्थानिक नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी केव्हा सतर्क,कर्तव्यदक्ष,कार्यक्षम होणार? हा प्रश्न चिमूरकरांच्या जिव्हारी लागणारा आहे.
निवडणूका आल्या की शब्दांचा सद्उपयोग करणे आणि निवडणुका संपल्या की नागरिकांना घुमवणे,ही राजकारण्यांची कार्यपद्धत,त्यांच्यातीलच उनिवा बाहेर पाडत असली तरी असंवेदनशीलपणाचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी नकोच!,असे म्हणण्याची वेळ चिमूरकरांवर यायला नको….



