Home Maharashtra विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांसाठी विशेष शिबिर राबविण्याची मागणी :- उपसरपंच अशोक चौधरी…

विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांसाठी विशेष शिबिर राबविण्याची मागणी :- उपसरपंच अशोक चौधरी…

शुभम गजभिये

विशेष प्रतिनिधी…

      दहावी व बारावी परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून आता विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागत आहे.

        महाविद्यालयीन प्रवेश,शिष्यवृत्ती,व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच विविध शासकीय योजनांसाठी विद्यार्थ्यांना डोमिसाईल,जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलियर,उत्पन्न प्रमाणपत्र,रहिवासी दाखला व इतर आवश्यक कागदपत्रांची तातडीने आवश्यकता भासत आहे.

        मात्र ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना व पालकांना कागदपत्रांसाठी वारंवार तहसील कार्यालय,सेतू केंद्र व विविध शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.सर्व्हर समस्या,अपूर्ण माहिती,कागदपत्रांची पडताळणी आणि वेळेअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

       याबाबत शंकरपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री. अशोक चौधरी यांनी तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन तातडीने विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रशासनाकडे त्यांनी प्रमुख मागण्या मांडल्या आहेत….

  — दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष कागदपत्र शिबिर आयोजित करण्यात यावे.

     — डोमिसाईल,जात प्रमाणपत्र,नॉन क्रिमिलियर,उत्पन्न प्रमाणपत्र आदी कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी.

    — विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध करून “एक खिडकी योजना” राबवावी.

    — ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन व अर्ज सहाय्यता केंद्र सुरू करण्यात यावे.

    — सेतू केंद्र व तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करावेत.

सर्व्हर व तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून अर्ज प्रक्रियेला गती द्यावी.

   — विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्याने मंजूर करून कमी कालावधीत प्रमाणपत्र वितरित करण्यात यावेत.

      उपसरपंच अशोक चौधरी यांनी सांगितले की,“विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा टप्पा असून केवळ कागदपत्रांच्या विलंबामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.

       प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत विद्यार्थ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत.”

      तसेच तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी समन्वय साधून विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविल्यास ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.