Home देशविदेश माणसाची ओळख…..

माणसाची ओळख…..

        भारतीय माणूस इतर कोणत्याही माणसाची ओळख करून घेण्यासाठी केवळ त्याचे नावावरच किंवा गाव,जिल्हा,प्रांत यावरच न थांबता याही पेक्षा महत्त्वाची त्यास ओळख वाटते,ती त्याच्या जातीची आणि धर्माची!…

       कुठेही म्हणजे प्रवासात किंवा एखाद्या बैठकीत,शिबिर,मेळाव्यात जेंव्हा माणसे एकमेकास भेटतात,तेंव्हा अनौपचारिक रित्या एकमेकांच्या जातीचा,धर्माचा संभाषणातून शोध लावतात.

         एवढ्यावरच ते थांबत नाहीत,तर ज्याचेत्याचे जातीचे आणि धर्माचे जे संस्कार असतात,त्यानुसार एकमेकाशी वागतात.

        याचा अर्थ ते जात आणि धर्म पाळण्याचे कार्य करतात,परंतु जात धर्म सोडण्याचे कार्य करीत नाही.उदा.जात एकदा समजली,किंवा धर्म एकदा समजला की,मग त्यानुसार त्यास कोणता नमस्कार करायचा? त्यास कोणते अभिवादन करायचे?कुणाशी दोस्ती करायची? कुणाला जवळ वा दूर ठेवायचे,ते ठरविल्या जाते.

        एव्हढेच नव्हे तर कळस म्हणजे खेड्यात जसे,जसे जाती आणि धर्मद्वेश करतात,तसे एकमेकाशी फटकून वागतात,अगदी तसेच प्रवासात किंवा मेळाव्यात पण वर्तन करताना दिसतात.

        खरे तर फक्त एक दोन दिवस एकत्र राहायचे असते,पण तेव्हढे सुद्धा आपण एकमेकाशी माणूस म्हणून मानवतेच्या नात्याने वागण्याची अक्कल भारतीय माणसात नसते.याचा अर्थ ते बेअक्कली असतात,असेच म्हणावे लागते.

         कारण दोन दिवस सुद्धा एकमेकांची जात अन् धर्म न विचारता एकत्र रहाण्याची सहनशीलता यांच्यात नसते.असे वागण्याचे कारण म्हणजे धर्माचा गर्व आणि जातीचा अभिमान.

          माणसावर जातीचे आणि धर्माचे त्याच्या कुटुंबात एव्हढे दृढ संस्कार पडले आहेत की,माणूस धर्मांध आणि जात्यांध झाला.इतरांपासून दूर झाला.माणसाने माणुसकी सोडली.मानवता धर्म म्हणजे काय हे त्याला अजूनही कळले नाही.

          माणूस जन्माला येऊन,म्हणजे माणसाच्या जातीला जन्मून माणूस माणसाप्रमाणे न वागता,एखाद्या हिंस्र प्राण्याप्रमाणे वागत असतो.इतर जातीच्या धर्माच्या व्यक्तींशी शत्रुत्वाची वागणूक देतो घेतो.एव्हढेच नाही तर स्वार्थापायी कुटुंबीय आणि नातेवाईकांसाठी पण शत्रूत्व करतो,त्यांच्याशी पण माणुसकीने वागत नाही.असा हा माणूस असूनही माणसाप्रमाणे न वागणारा कृतघ्न भारतीय माणूस.एकसंघ भारत कसा टिकविणार ? असा यक्ष प्रश्न शहाण्या माणसापुढे उभा आहे.

         जो पर्यंत भारतीय माणूस जात आणि धर्म यांचा त्याग करणार नाही,तो पर्यंत माणूस माणसाची ओळख ” माणूस ” म्हणून करून घेणार नाही.आणि असे घडणार नसेल तर भारतीय माणूस स्वतःच्या हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो आहे,हे समजणार नाही.

         या करिता आज पासून,आतापासून,या क्षणापासूनच भारतीयांनी समोरच्या माणसाचा विचार करताना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन करावा.कुणालाही माणूस म्हणूनच बघावे.त्याच्या जातीची,धर्माची चौकशी करू नये.दोन तास असो की दोन दिवसाच्या त्याच्या सानिध्यात त्यासी मित्रत्वाचे नाते जोडावे.यात जो आनंद आहे,तो कुठेच मिळणार नाही.

              लेखक

             दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड.

दिनांक : 16 मे 2026, फोन : 9420912209…