Home Maharashtra जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती व अंमलबजावणी बाबत सरकार उदासीन :- प्रा.श्याम मानव…

जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती व अंमलबजावणी बाबत सरकार उदासीन :- प्रा.श्याम मानव…

 प्रेम गावंडे 

  उपसंपादक 

दखल न्युज भारत

        चंद्रपूर :- संत आणि सुधारकांच्या पुरोगामी महाराष्ट्रात खरात सारख्या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढले असून मोठ्या प्रमाणात जनता विशेषत:स्त्रियां अशा बाबांना बळी पडत आहेत. त्यांचे मानसिक आर्थिक आणि लैंगिक शोषण होत आहे.

          अशा भोंदू बाबांना तसेच अंधश्रद्धामुळे होणाऱ्या शोषणाला व फसवणुकीला आळा घालण्यासाठी अतिशय परिश्रमाने तयार करण्यात आलेला जादूटोणाविरोधी कायदा हा क्रांतिकारी व प्रभावी कायदा महाराष्ट्रात असून सुद्धा अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदू बाबांचे प्रस्थ वाढविणारे व समर्थन करणारे राज्यातील मंत्री व सरकार जादूटोणा विरोधी कायद्याच्या जनजागृती व अंमलबजावणी बाबत उदासीन असल्याचे परखड मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-संघटक श्याम मानव यांनी व्यक्त केले.

       ते अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विविध सामाजिक राजकीय संघटनांद्वारे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बुवाबाजी विरोधी अभियानांतर्गत ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

        आमदार सुधाकर अडबाले यांनी व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व अभियान प्रमुख सुरेश झुरमुरे, राज्य संघटक हरिभाऊ पाथोडे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

           सुंदरदास महाराज, आसाराम, राम रहीम, नित्यानंद ते अलीकडील भोंदू खरात पर्यंतच्या ढोंगी बाबांचे दाखले देत प्रा.शाम मानव यांनी हे सर्व बाबा महिलांना कसे जाळ्यात ओढतात व त्यांचे विविध प्रकारे कसे शोषण करतात याचे विश्लेषण करून अशा बाबांना बळी पडणाऱ्या महिलांना दोष न देता त्यांच्यावर बालपणापासून झालेले संस्कार जबाबदार असल्याचे सांगितले तसेच जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती व अंमलबजावणी सोबतच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे नितांत गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

         आमदार सुधाकर अडबाले यांनी सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन कार्याचे महत्व विषद केले. सुरेश झुरमुरे यांनी बुवाबाजी विरोधी अभियानाची भूमिका मांडली. प्रास्ताविक हरिभाऊ पाथोडे यांनी केले. संचालन धनंजय तावाडे यांनी तर अनिल दहागांवकर यांनी आभार प्रदर्शन केले.

           नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात व प्रचंड गर्दीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदू सोनारकर, अविनाश आंबेकर, राजकुमार चिकटे, निलेश पाझारे, सतिश मालेकर, रजनी कार्लेकर, निखिलेश चामरे, अमूल रामटेके, गोलू बारहाते, टिंकू खाडे, मोहन कश्यप, सुरज दहागांवकर, मंगेश नैताम यांनी परिश्रम घेतले.