दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी :- खेड तालुक्यातील आळंदी मंडळ भागातील गावांसाठी फ्रुटवाले धर्मशाळा, आळंदी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य, महिला व बालविकास, अन्न व नागरी पुरवठा आदी विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
शिबिरात ई-फेरफार प्रणालीअंतर्गत ९४ फेरफार मंजूर करण्यात आले. तसेच ६५५ सातबारा व २४० आठ-अ उतारे वितरित करण्यात आले. रेशनकार्ड ३७ कुटुंबांना देण्यात आले असून ४१ नवीन अर्ज स्वीकारण्यात आले. डोमासाईल दाखले १०५, जात प्रमाणपत्रे २६९, उत्पन्न दाखले १४० वितरित करण्यात आले.
कृषी विभागामार्फत ८८ शेतकऱ्यांना महाडीबीटी योजनेचा लाभ व बियाणे अर्ज सुविधा देण्यात आली. आरोग्य विभागाने ४५ लाभार्थ्यांना वैद्यकीय सेवा दिली. तसेच आयुष्मान कार्ड १३२, आधार सेवा १२५ लाभार्थ्यांना देण्यात आल्या. संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेंतर्गत २३ लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
या शिबिरातून विविध योजनांचे एकूण २ हजार ३६३ लाभ नागरिकांना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, जिल्हा परिषद सदस्य विनयाताई मुंगसे, पंचायत समिती सभापती विद्याताई मोहिते, उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले, पंचायत समिती सदस्य गोरी मुऱ्हे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, सुधीर मुंगसे, चंदन मुऱ्हे, अजित वडगावकर, रवींद्र कुऱ्हाडे, रनजीत पगडे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



