Home Vidarbha विवाह नोंद प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्याची मागणी…

विवाह नोंद प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्याची मागणी…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

देसाईगंज (वडसा) 

       विवाह नोंद प्रमाणपत्रावर क्यूआर कोड नसल्यामुळे नवविवाहित महिलांना विविध शासकीय व बँकिंग कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे. यासंदर्भात नगर परिषद देसाईगंज येथील पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती सचिन भास्कर खरकाटे यांनी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे.

        निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, विवाहानंतर महिलांच्या नावात बदल करण्यासाठी क्यूआर कोड असलेले ऑनलाइन विवाह नोंद प्रमाणपत्र आवश्यक असते, असे आधार केंद्र चालकांचे म्हणणे आहे. मात्र, शहरी भागात दिल्या जाणाऱ्या विवाह प्रमाणपत्रांवर अद्याप क्यूआर कोड देण्यात येत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

       यामुळे नवविवाहित महिलांना आधार कार्ड नाव बदल, बँक खाते उघडणे, मतदान ओळखपत्र तयार करणे तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे या प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात क्यूआर कोडसह प्रमाणपत्रे दिली जात असताना शहरात ही सुविधा नसल्याने असमानता जाणवत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अती.जिल्हा दंडाधिकारी मा.आशिष वानखेडे यानां देण्यात आले.निवेदन देते वेळी भाजपा जिल्हा सचिव सचिन वानखेडे,अब्रार शेख,आशिष खरकाटे उपस्थीत होते.

        तरी संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत शहरी भागातही क्यूआर कोड असलेली विवाह नोंद प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.