शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील माकोना ते गिरोला रस्ता बांधकामाच्या रखडलेल्या प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते जगदीश मेश्राम आणि ५० शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाला अखेर प्रशासनाने नमते घेतले आहे.
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत रस्त्याच्या अधिकृत मोजणीसाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
प्रशासनाच्या या सकारात्मक पावलामुळे येत्या १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणारे ‘विष प्राशन’ आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून मोजणीचे आदेश माकोना ते गिरोला रस्ता कामात अनेक तांत्रिक अडचणी आणि हलगर्जीपणामुळे शेतकरी संतप्त झाले होते.यावर प्रभावी बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने ६ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता प्रत्यक्ष जागेवर जाऊन मोजणी करण्याचे निश्चित केले आहे.
यासाठी शिरस्तेदार श्रीमती वाय.एस.माहोरे,निम.श्रीमती एस बी.पिंपळकर आणि भूकरमापक श्री.एस.पी.बेजुरवार यांचे पथक मोक्यावर हजर राहणार आहे.
आंदोलन केवळ ‘स्थगित’, संपलेले नाही!…
या संदर्भात बोलताना जगदीश मेश्राम यांनी स्पष्ट केले की, “प्रशासनाने मोजणीसाठी पत्र काढल्याने आम्ही १ मे चे आंदोलन स्थगित करत आहोत.
मात्र,ही केवळ मोजणीपुरती मर्यादित कारवाई नसावी.जर मोजणीनंतरही जिल्हा परिषद बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता बांधकामात टाळाटाळ केली किंवा कंत्राटदाराचा प्रश्न सुटला नाही,तर आमचा आंदोलनाचा पवित्रा कायम राहील.”
शेतकऱ्यांचे लक्ष ६ मे च्या मोजणीकडे मोजणीच्या वेळी सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.रस्ता नेमका कोठून जाणार आणि झालेली चूक कशी सुधारली जाणार, हे ६ मे रोजी स्पष्ट होईल. जर यातून मार्ग निघाला नाही, तर शेतकरी पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत.
या विजयामुळे माकोना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण असून,प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे.



