राकेश चव्हाण
कुरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा : शहरातील बायपास रोडवर आज दुपारी ट्रक व टिप्पर या दोन जड वाहनांमध्ये अचानक बिघाड झाल्याने सुमारे दोन तास वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या घटनेमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, बायपास मार्गावर समोरासमोर आलेल्या ट्रक व टिप्परपैकी एकाचे इंजिन अचानक बंद पडले, तर दुसऱ्या वाहनालाही तांत्रिक अडचण निर्माण झाली. परिणामी दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकून राहिली. यामुळे छोट्या वाहनांसह प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व वाहनचालकांनी स्वतःहून पुढाकार घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक नियंत्रणात आणली. बिघाडग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.सध्या महामार्गाचे काम सुरु असल्यामूळे असे प्रकार दररोज दिसत आहे.
महामार्गाचे काम सुरु,रोड अरुंद,अरुंद रोड वरुन ये जा करणारी वाहने असा प्रकार दररोज होत आहे. बायपाससारख्या महत्त्वाच्या मार्गावर व वर्दळिच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



