Home Maharashtra २० एप्रिल रोजी होणार राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा…

२० एप्रिल रोजी होणार राजमाता राणी हिराई जन्मोत्सव सोहळा…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक..

चंद्रपूर २० एप्रिल : जिल्हा प्रशासनाच्या वतीने राजमाता राणी हिराई यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा २० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता कोहिनूर मैदान,दादमहाल वॉर्ड,चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्याचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुइके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमास विविध मान्यवर लोकप्रतिनिधी,अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

         राजमाता राणी हिराई या गोंडवाना इतिहासातील एक प्रेरणादायी व गौरवशाली व्यक्तिमत्त्व असून त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त समाज प्रबोधन तसेच सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या माध्यमातून स्थानिक संस्कृतीचे जतन,इतिहासाची जाणीव आणि नव्या पिढीमध्ये अभिमानाची भावना निर्माण करण्याचा उद्देश आहे.

          यात राजमाता राणी हिराई बहुउद्देशीय सेवा समिती,चांदवाड यांच्या वतीने १९ व २० एप्रिल दरम्यान वनउत्पादने तसेच हस्तकला प्रदर्शन व विक्री,तसेच विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये गोंडी नृत्य,पारंपरिक वाद्य,लोककला सादरीकरणे,तसेच स्थानिक कलाकारांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे.

          २० एप्रिल रोजी सकाळी विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम,तर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमामध्ये पारंपरिक नृत्य,गोंडी संस्कृतीचे दर्शन घडविणारे सादरीकरणे तसेच विविध कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. तरी चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या जन्मोत्सव सोहळ्याचा लाभ घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.