Home उपक्रम इंद्रायणी उगम ते संगमापर्यंत प्रदूषणमुक्त इंद्रायणी, हेच उद्दिष्ट :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे…...

इंद्रायणी उगम ते संगमापर्यंत प्रदूषणमुक्त इंद्रायणी, हेच उद्दिष्ट :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे… — आळंदीतील सिद्धबेट येथे विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : “इंद्रायणी नदी ही संतभूमीची जीवनरेखा असून तिचे पावित्र्य जपणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. जोपर्यंत वारकऱ्यांना नदीतील पाणी तीर्थ म्हणून स्वच्छपणे प्राशन करता येत नाही, तोपर्यंत ही स्वच्छता मोहीम थांबणार नाही. उगम ते संगमापर्यंत इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार आळंदी नगरपरिषद व देवस्थानने केला आहे,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.

        स्वच्छता अभियानांतर्गत आळंदीतील सिद्धबेट येथे विशेष स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. आळंदी देवस्थान, वारकरी, तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसरातील खुरटी झुडपे, पालापाचोळा आणि प्लास्टिक कचरा साफ करून सुमारे तीन ट्रॅक्टर भरून कचरा गोळा करण्यात आला.

         संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या सिद्धबेट परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी तुळस, वड, पिंपळ, उंबर आदी वृक्षांची लागवड करून निसर्ग संवर्धनासही चालना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

          या मोहिमेमुळे इंद्रायणी नदी स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मोठी मदत होत असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी महादेव खांडेकर यांनी नमूद केले. “सिद्धबेट स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी वारकरी, भाविक आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहनही त्यांनी केले.

         या अभियानात उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, नगरसेवक-नगरसेविक, आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी तसेच वारकरी सहभागी झाले होते. सर्वांनी हातात झाडू घेऊन सुमारे एक तास परिसराची स्वच्छता केली. यामध्ये कागदपत्रे, कॅरीबॅग, प्लास्टिक बाटल्या आदी टाकाऊ वस्तू गोळा करण्यात आल्या.

          दरम्यान, आळंदी नगरपरिषद गेल्या तीन महिन्यांपासून प्रत्येक एकादशीला इंद्रायणी नदी स्वच्छता मोहीम राबवत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “नगरसेवकांनी स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छतेचा आदर्श निर्माण केला आहे,” असे सांगितले.