भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा तालुक्यामध्ये चालू रब्बी हंगामामध्ये शेकडो शेतकऱ्यांनी मक्का पिक उत्पादन घेत असून तालुक्यात मका खरेदी केंद्र नसल्याने मक्का पीकाचे उत्पादन घेवून विकणार कोठे आणि कसे असा प्रश्न शेतकऱ्यांन पुढे निर्माण झाला असल्याने धानोरा तालुक्यामध्ये मका खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी दिवाकर भोयर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांना उन्हाळ्यात धान पिकांचे उत्पादन घेण्यासाठी येणारा अधिकचा खर्च,पाण्याचा अतिरिक्त वापर त्यातही भारनिमाच्या त्रासामुळे मागील तीन-चार वर्षापासून शेतकऱ्यांनी धान्याला पर्याय म्हणून उन्हाळ्यामध्ये कमी पाण्यात टिकणाऱ्या मका पिकाची निवड केली .तालुक्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.
मका पिक हळूहळू हाती यायला सुरुवात झाली असून त्यात अवकाळी पाऊस,वादळ, आणि सोसाट्याचा वारा शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसत असल्याचे चित्र बघायला मिळते.त्यामुळे हाती आलेला मका विकायचा कुठे?असा प्रश्न भेडसावत आहे. शेतकऱ्यांकडे मका पीक यायला सुरुवात झाल्याबरोबर व्यापाऱ्यांकडून आखाती युद्धाची भीती दाखवत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
भारताची निर्यात थांबल्याचे सांगत पडल्या भावात मका खाजगी व्यापारी कवडी मोल भावात मका खरेदी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. बळीराजा ने स्वताच्या शेतात मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असली तरी धानोरा तालुक्यात आधारभूत खरेदी केंद्र मका पिकासाठी शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही.
धानोरा तालुक्यात मका उत्पादन शेतकऱ्यांना आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांत मका खरेदी करण्याची परवानगी देण्यात यावी.संपुर्ण धानोरा तालुक्यात मका खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी दिवाकर भोयर यांनी केली आहे.



