लक्षवेधी
ऋषी सहारे
संपादक
गडचिरोली : १४ एप्रिल रोजी साजरी होणाऱ्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्ह्यात काढण्यात येणाऱ्या भव्य रॅलीवर प्रशासनाने घातलेल्या वेळेच्या मर्यादेमुळे आंबेडकरी समाजात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री १० वाजेपर्यंतच रॅलीची परवानगी देण्यात आल्याने समाजाच्या उत्साहावर मर्यादा आणली जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.याबाबत आजाद समाज पार्टीने तीव्र आक्षेप घेत वेळ मर्यादा 12 वाजता पर्यंत करण्यात यावी म्हणून आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांना युवा अध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.या दिवशी लाखो अनुयायी रॅली, मिरवणुका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतात. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयामुळे अनेक कार्यक्रम अपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर आजाद समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेत गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. रॅलीची वेळ रात्री १० ऐवजी किमान १२ वाजेपर्यंत वाढवून देण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आजाद समाज पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त करत तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली.समाजाच्या भावनांचा आदर करून पोलीस प्रशासनाला आवश्यक ते निर्देश द्यावेत,अशी विनंती करण्यात आली.
दरम्यान, प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


