Home Social पी.एम.श्री.अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,चिमूर येथे ७७ वा प्रजासत्ताक...

पी.एम.श्री.अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा,चिमूर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…

   रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

चिमूर :- येथील पी.एम.श्री. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.

     कार्यक्रमाची सुरुवात भारतीय क्रांतिकारकांना नमन करून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता खोब्रागडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले.त्यानंतर झेंडा गीत सादर करण्यात आले तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

         या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थिनींनी साकारलेली संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिकृती,ज्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

        विद्यार्थिनींनी देशभक्तीपर आधारित अतिशय सुंदर नृत्यप्रस्तुती सादर केली.तसेच प्रेरणादायी भाषणे व देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.

        यावेळी शाळेमध्ये वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.

        गणित संबोध परीक्षा,प्रश्नमंजुषा (संविधान व गणितावर आधारित), चित्रकला,पोस्टर,रांगोळी,सामान्य ज्ञान अशा विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

         तसेच माध्यमिक शालांत परीक्षा सत्र २०२४–२५ मध्ये ९०.४० टक्के गुण प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केलेल्या कु.सानिया शामराव रामटेके हिचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

          कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ॲड.सातार्डे मॅडम,विनोद सहारे व शामराव रामटेके उपस्थित होते.यावेळी ॲड.सातार्डे यांनी वकिली व्यवसायाचे महत्त्व व समाजातील त्याची आवश्यकता याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

       या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक प्रिया बोरकर,विनय खापर्डे,दत्तात्रय पुलेनवार,अनुराधा महाजन,राजरत्न गजभिये,पंकज काळे,ज्योत्सना नेऊलकर,प्रतीक्षा घ्यार,सचिन भरडे तसेच बाह्य स्रोत कर्मचारी उपस्थित होते.सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आरूषी दहीवले यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.प्राजक्ता उंबरकर यांनी मानले. सर्व विद्यार्थिनींनी विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आनंदाने प्रजासत्ताक दिन साजरा केला.

         अशा प्रकारे शाळेत देशभक्ती,संविधानिक मूल्ये व सामाजिक जाणीव यांचा संगम साधत ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.