भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
पोर्ला वनपरिक्षेत्रातून जंगलात संचार करत असलेले जंगली हत्ती आता रांगी वनपरिक्षेत्रात दाखल झाले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान सुरु आहे. नरचुली आणि पिपरटोला परिसरात गेल्या दोन दिवसांपासून तब्बल 31 ते 32 हत्तींचा कळप ठाण मांडून आहे. या कळपामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीती आणि दहशत निर्माण झाली आहे.
काल 8 डिसेंबर रोजी रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान रांगी येथील नामदेव बैस आणि हेमंत कांटेगे यांच्या शेतातील मळणीसाठी ठेवलेल्या धान्याच्या पुजन्यावर हत्तींच्या कळपाने हल्ला करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतात कापून धानाच्या गंजी बनवून ठेवलेल्या ठिकाणी हत्तींच्या धुमाकूळामुळे धानाची गंजी उद्ध्वस्त झाली आणि शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला गेला.
हत्तींच्या कळपामुळे गेल्या दोन दिवसांत नरचुली आणि पिपरटोला परिसरातील शेतसरोवरात अनेक ठिकाणी धान्य, गंजी आणि पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे या भागातील शेतीक्षेत्रास मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
घटनेनंतर रांगी विभागाकडून तातडीने पंचनामा करण्यात आला असून पीडित शेतकऱ्यांनी सरकारकडून तत्काळ नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. वनविभागाने त्वरित उपाययोजना करून हत्तींचा कळप दुसरीकडे वाळवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे



