शिक्षण,आरोग्य,शेती,जल,जंगल,उद्योग,प्रशासन,समाज,सत्ता, धर्म, कोणतेही क्षेत्र असो,थोडक्यात आर्थिक,सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक,धार्मिक क्षेत्रात जर बदल घडवून आणायचा असेल,म्हणजेच कृषी क्रांती,शिक्षण क्रांती,उद्योग क्रांती,जलक्रांती, वनक्रांती,आरोग्य क्रांती ,राज्यक्रांती,समाज क्रांती,धर्मक्रांती,सांस्कृतिक क्रांती करायची असेल तर त्यासाठी समर्पण भाव पाहिजे.म्हणजेच समर्पणाची भावना, इच्छा,विचार,आणि कृतीची गरज आहे.
समर्पणासाठी बुद्धीची आणि मनाची तयारी पाहिजे.समर्पित भावनेने केलेले कार्यच क्रांती घडवू शकते.यासाठी जसे धार्मिक लोक ” तन मन धन गुरुस अर्पण ” असा डोस देतात,तोच डोस क्रांतीसाठी आवश्यक आहे.
कार्यकर्त्यांचे दोन प्रकार आहेत,1 पेड वर्कर.2 अनपेड वर्कर. पेड वर्कर म्हणजे मानधन घेऊन काम करणारा ( कर्मचारी नव्हे,कर्मचारी म्हणजे पगार घेणारा ), अनपेड वर्कर म्हणजे मानधन न घेता कार्य करणारा कार्यकर्ता.
इथे एक प्रश्न पडतो,तो हा की,मानधन घेऊन ( stipend ) पूर्णवेळ कार्यकर्ता हा समर्पित कार्यकर्ता होऊ शकतो का ? याचे उत्तर असे की,ज्याची घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे,परंतु तो समर्पित भावनेने कार्य करीत असेल,तर त्यास मानधन जरूर दिले पाहिजे.परंतु तो केवळ पैशासाठीच क्रांतिकार्य करीत असेल तर त्यास त्यागी कार्यकर्ता म्हणता येणार नाही,तर तो भोगी कार्यकर्ता होय.त्यास समर्पित कार्यकर्ता म्हणता येणार नाही.आणि विचाराने आणि मनाने तो खरोखरच समर्पित असेल ,तर अशा मानधन घेऊन परिवर्तन किंवा क्रांतिकारी कार्य करीत असेल,तर अशा कार्यकर्त्या समर्पित कार्यकर्ता म्हणायला हरकत नसावी,आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली बेहतरीन आहे,अशांनी मानधन न घेता कार्य केले तर अशा कार्यकर्त्यास पण समर्पित कार्यकर्ता म्हटले पाहिजे.थोडक्यात महत्त्वाचे हे की,पैसा ही दुय्यम बाब आहे,प्रथम बाब ही की,कार्यकर्ता विचाराने आणि भावनेने समर्पित आहे की नाही ?.
अर्धवेळ आणि पूर्णवेळ असे समर्पित कार्यकर्त्यांचे दोन प्रकार आहेत.अर्थात ज्याच्या त्याच्या कौटोंबिक परिस्थिती आणि व्यावसायिक परिस्थितीनुसार ज्याला जेव्हढा वेळ समाजकार्यासाठी देता येईल,तेव्हढ वेळ समर्पण भावाने दिला तरी अशा कार्यकर्त्या अंशकालीन समर्पित कार्यकर्ता म्हणता येईल.
आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक कोणतेही क्षेत्र असो,त्या क्षेत्राचा भूतकाळ म्हणजे इतिहास,वर्तमान स्थिती,आणि भविष्य काय आणि कसे असले पाहिजे ? याचा विचार करणे ,हे क्रांतीसाठी आवश्यक आहे,असा विचार न करता केलेली क्रांती ही फेल जाते,वाया जाते.
याहीपेक्षा महत्वाची गोष्ट ही की,समाज हा अर्थव्यवस्था,जातीव्यवस्था, धर्मव्यवस्था राज्य व्यवस्था कशी आहे ? यावर अवलंबून असतो,नव्हे या परिस्थितीचे ,व्यवस्थेचे चांगले वाईट परिणामाची शिकार होत असतो.याचा अर्थ विषमतेची व्यवस्था,असेल तर समाजास कठीण परिस्थितीत जीवन जगावे लागते,आणि समतेची व्यवस्था परिस्थिती असेल तर आम जनतेस सुकून मिळतो.सुख शांती आनंद समाधान मिळते.म्हणून वाईट परिस्थिती बदलण्यासाठी पूर्णवेळ आणि समर्पित कार्यकर्त्यांची नितांत गरज आहे.जास्तीत जास्त समर्पित त्यागी कार्यकर्त्यांची समाजास देशास अत्यंत गरज आहे.
क्रांती याचा अर्थ बदल.संपूर्ण बदल.आणि परिवर्तन याचा अर्थ क्रांतीची प्रक्रिया होय.प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय क्रांती होत नाही,आधी विचार बदलणे,ही क्रांतीची पहिली पायरी होय,नंतर संघटित होणे,ही क्रांतीची दुसरी पायरी ,संघटित आणि एक धेय्य समोर ठेवून संघर्ष करणे ही क्रांतीची तिसरी पायरी होय, सत्ता बदलणे ही चौथी पायरी होय.या चार पायऱ्या म्हणजेच परिवर्तन .परिवर्तन म्हणजेच प्रकिया होय.प्रक्रिया पूर्ण झाली की क्रांतीची अवस्था येते.
उदा.पाण्यापासून वाफ आणि वाफेपासून पाणी तयार होण्यासाठी,तसेच पाण्यापासून बर्फ आणि बर्फापासून पाणी तयार होण्याची प्रक्रिया यासाठी लागणारे उष्णतामान हे आणि उसनातमानानुसार परिवर्तन आणि परिवर्तनाची शेवटची अवस्था म्हणजेच व्यवस्था होय.व्यवस्थेसाठीचे परिवर्तन ,( प्रक्रिया ) आणि यासाठी समर्पण याची आवश्यकता , ही एकंदरीत मांडणी कार्यकर्त्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.
थोडक्यात,विचार आणि आचरण यात परिवर्तन ,म्हणजेच विचार बदलले की,कार्य बदलते,जसे विचार तशी कृती घडते,यातूनच क्रांती होते.पण क्रांती ही समर्पित कार्यकर्त्या शिवाय शक्य नाही.म्हणून समर्पण आणि क्रांती यांचे नाते जवळचे आहे.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक: 23 नोव्हेंबर 2025. फोन: 94 20 91 22 09.


