Home Crime सागवान झाडांच्या रहदारी परवान्यासाठी ₹6,000 लाचेची मागणी, परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा...

सागवान झाडांच्या रहदारी परवान्यासाठी ₹6,000 लाचेची मागणी, परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल…

अबोदनगो एस.चव्हाण

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत

अमरावती :- सागवान झाडांच्या हॅमरिंग व रहदारी पास मिळवून देण्यासाठी ₹6,000 लाचेची मागणी केल्याप्रकरणी परतवाडा येथील एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने तक्रारदाराकडून थेट लाच स्वीकारली नसली तरी लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने प्रकरण नोंदविण्यात आले आहे.

       वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय, परतवाडा येथे ही घटना घडली. श्रीमती निलीमा शालीग्राम सातव (वय ३८ वर्षे) पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांनी ही कारवाई केली.

      अभय भिमसेन चंदेल (वय ५० वर्षे) पद – वनपाल (वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय परतवाडा) रा. कांडली, परतवाडा ता. अचलपूर, जि. अमरावती यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अभय चंदेल यांनी त्यांच्या शेतातील सागवान झाडांची हॅमरिंग करून रहदारी पास मिळवून देण्यासाठी ₹6,000 लाच मागितली होती.

        ही तडजोड झाल्यानंतर लाच मागणीची खातरजमा करण्यासाठी १ ऑगस्ट २०२५ रोजी पडताळणी कार्यवाही करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले; मात्र त्याला संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारले नाहीत.

       तरीही लाच मागणीचा गुन्हा सिद्ध झाल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ अंतर्गत प्रकरण नोंदविण्यात आले. या प्रकरणाची नोंद परतवाडा पोलिस ठाण्यात कलम ७, ७(१) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ प्रमाणे करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.