Home Social ग्रामगीता महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा… — ग्रंथवाचनाशिवाय सर्वांगीण विकास अशक्य...

ग्रामगीता महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा… — ग्रंथवाचनाशिवाय सर्वांगीण विकास अशक्य : प्राचार्य डॉ. सुनंदा आस्वले…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी 

चिमूर : स्थानिक ग्रामगीता महाविद्यालयात भारताचे ११ वे लोकप्रिय राष्ट्रपती व ‘मिसाइल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

         कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुनंदा आस्वले होत्या.

       यावेळी त्या म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांनी आपला सर्वांगीण विकास साधायचा असेल तर ग्रंथवाचनाशिवाय दुसरा सर्वोत्तम मार्ग नाही.आजच्या संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात वाचन संस्कृतीचा होत असलेला ऱ्हास ही चिंतेची बाब असून त्यामुळे विद्यार्थी अखंड ज्ञानप्रवाहापासून दूर जात आहेत.” अशी खंत व्यक्त केली.

         कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.निलेश ठवकर आणि डॉ.मृणाल वऱ्हाडे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,नियमित वाचनामुळे विद्यार्थ्यांची संभाषण कौशल्ये विकसित होतात,आत्मविश्वास वाढतो आणि वक्तृत्वकलेत सुधारणा होते. 

      तसेच वर्तमानपत्र वाचनामुळे समाजातील घडामोडींची अचूक जाण होते,असेही त्यांनी नमूद केले.

        कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा.संदिप मेश्राम यांनी केले. या निमित्ताने “सामाजिक माध्यमाच्या युगात ग्रंथवाचनाचे महत्त्व” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ.बिजनकुमार शिल यांनी केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण वातावरण वाचन संस्कृती जपण्याच्या प्रेरणादायी भावनेने भारलेले होते.