दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी विश्व हिंदू परिषदचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष व हिंदू हेल्पलाईनचे संस्थापक डॉ.प्रवीण तोगडिया हे आज माऊलींच्या नगरीत आळंदीत दाखल झाले. समाधी मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा-अर्चा करून समाधीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर आळंदी देवस्थान समितीच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे यांनी त्यांचा सन्मान करून स्वागत केले. या वेळी त्यांनी समाधी परिसराची पाहणी केली आणि मंदिरातील ऐतिहासिक व आध्यात्मिक परंपरेची माहिती जाणून घेतली.
डॉ.तोगडिया यांनी श्रीमाऊलींच्या चरणी नतमस्तक होत संपूर्ण राष्ट्राच्या प्रगतीसाठी, सामाजिक सौहार्द, हिंदू समाजाच्या ऐक्यासाठी तसेच भाविकांच्या आरोग्य-संपन्नतेसाठी प्रार्थना केली. त्यांनी असेही सांगितले की, “आळंदी ही केवळ पुण्यभूमी नसून अध्यात्म व भक्तीचे उगमस्थान आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने समाजात प्रेम, बंधुभाव व धर्ममूल्यांची जपणूक व्हावी, हीच प्रार्थना मी केली आहे.”



