दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : माऊलींच्या नगरीत नागरीत झालेला हा माझा वैयक्तिक गौरव नसून, माझ्यावर अढळ विश्वास ठेवणाऱ्या आणि मला जनसेवेची संधी देणाऱ्या तमाम जनतेचा सन्मान आहे. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अनेक वर्षांपासून ज्ञानदानाचे हे कार्य अविरतपणे करत आहे.
अशा संस्थेकडून मिळालेला हा सन्मान मला माझ्या खात्यामार्फत महाराष्ट्रातील जनतेची अधिक निष्ठेने सेवा करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. तसेच शिक्षण हे समाज व राष्ट्र उभारणीचे पवित्र कार्य आहे असे मत राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांनी व्यक्त केले.
सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज समाधी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरतशेठ गोगावले यांचा भव्य नागरी सत्कार श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त हभप चैतन्य महाराज लोंढे, संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, ज्येष्ठ विश्वस्त एल.जी.घुंडरे, सचिव अजित वडगावकर, संजय घुंडरे, रामभाऊ भोसले, शिवसेना शहरप्रमुख राहूल चव्हाण, प्राचार्य सुर्यकांत मुंगसे, चेअरमन बाबुलाल घुंडरे, अनिल वडगांवकर आदि मान्यवर उपस्थित होते.



