Home Maharashtra नगरविकास खात्याकडून महाद्वार – शनि मंदिर – भक्त पुंडलिक मार्ग विकासासाठी ५...

नगरविकास खात्याकडून महाद्वार – शनि मंदिर – भक्त पुंडलिक मार्ग विकासासाठी ५ कोटींचा निधी…

दिनेश कुऱ्हाडे 

  उपसंपादक 

आळंदी : नगरविकास विभागामार्फत “नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेअंतर्गत आळंदी नगरपरिषदेला तब्बल ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी महाद्वार ते शनि मंदिर, तेथून पुढे भक्त पुंडलिक मंदिर परिसरातील घाटकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून, यामुळे आळंदीतील वारकरी व भाविकांसाठी सुविधा अधिक आकर्षक आणि सुबक होणार आहेत.

        श्री क्षेत्र आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीमुळे संपूर्ण देशभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे येऊन दर्शन घेतात. भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, घाट परिसर सुशोभित व्हावा यासाठी आळंदी देवस्थान समितीने सातत्याने शासनाकडे मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले असून शासनाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे निश्चित करण्यात आले आहे.

         या घाटकामांमुळे महाद्वार परिसराचा चेहरामोहरा बदलणार असून शनि मंदिर व पुंडलिक मंदिर मार्गावरील घाट अधिक सुंदर, सुरक्षित व सोयीस्कर होतील. यामुळे भाविकांच्या दृष्टीने धार्मिक वातावरणाचा अनुभव अधिक समृद्ध होईल.

         आळंदी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने या निर्णयाचे स्वागत करत राज्य शासनाचे तसेच नगरविकास विभागाचे आभार मानले आहेत. “भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहरातील रस्ते व सुविधा सुधारण्याची गरज होती. मंजूर निधीमुळे आळंदी तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळेल, आळंदीतील पायाभूत सोयीसुविधांचा विकास हा काळाची गरज आहे. मंजूर झालेला निधी भाविक व वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोलाचा ठरेल, असे देवस्थानचे विश्वस्त हभप चैतन्य महाराज कबीरबुवा यांनी सांगितले.