स्वातंत्र्य बंधुभाव समता न्याय ही संविधानाची चार तत्वे सर्वच भारतीय जनतेनी आणि राजकारणी लोकांनी मान्य केले आहे,स्वीकारले आहेत.
व्यवस्थेचे तीन प्रकार आहेत…
1) भांडवली व्यवस्था…
2) समाजवादी व्यवस्था…
3) साम्यवादी व्यवस्था…
या तीनही व्यवस्थेत संविधानाची तत्वे अमलात आणण्याचा त्या त्या व्यवस्थेतील सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतो.परंतु स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही तत्वे भांडवली व्यवस्थेत अमलात येत नाहीत,किंवा येऊ शकत नाहीत.कारण भांडवली व्यवस्था टिकविणे,हे महत्त्वाचे धेय्य त्या व्यवस्थेतील सरकारचे असते,म्हणून ही चार तत्वे लागू करण्यासाठी जे सत्तेत जातात ते सरकारपुढे टिकत नाहीत.
ते निष्प्रभ हतबल असतात किंवा होतात.कारण कोणतेही सरकार हे शक्तिशाली असते.शक्तीपुढे तत्ववादी लोकप्रतिनिधी सत्तेत जाऊनही तत्त्वाचे राजकारण करू शकत नाहीत.उलट सत्ताधाऱ्यांचे च गुलाम बनतात.उदा.जॉर्ज फर्नांडीस. नितीश कुमार हे समाजवादी असूनही सत्तेत जाऊन किंवा सत्तेशी दोस्ती करून संविधानाची मूलतत्वे लागू करू शकले नाहीत,उलट त्यांच्या संगतीने त्यांनी आपले समाजवादी विचार सोडून भांडवली विचारांचे झाले.
भांडवलशाही म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विषमतेची. व्यवस्था होय.ज्या व्यवस्थेत गरीब मध्यम श्रीमंत असे तीन आर्थिक वर्ग असतात.तसेच ही भांडवलशाही टिकविण्यासाठी जातव्यवस्था अनेक जाती आणि अनेक धर्माची व्यवस्था आवश्यक असते.जात आणि धर्म या दोन गोष्टी भांडवलशाहीला पूरक असतात,ठरतात.कारण जाती जातीत ,धर्माधरमात भांडणे लाऊन म्हणजेच ” फोडा आणि झोडा ” या धोरणाचा अवलंब करता येतो, आनी भांडवलशाही टिकविता येते,यामुळे विषमतेवर आधारित भांडवली व्यवस्था टिकविता येते.जर जनतेनी जात आणि धर्म सोडला तर सारेच एक होतील,त्यांची एकजूट होऊन ते भांडवशाहीचे सरकार उलथून पडतील,यासाठी वर्ग जात धर्म यांना टिकविण्यासाठी भांडवलशाही सत्ताधारी जात वर्ग धर्माला खतपाणी घालून त्यांना संरक्षण देऊन टिकविण्याचे काम करतात.यामुळे स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही तत्वे केवळ बोलण्यासाठी असतात,पण व्यवहारात नसतात या व्यवस्थेत.
दुसरी व्यवस्था म्हणजे समाजवादी व्यवस्था.रशिया,चीन,व्हिएतनाम, क्युबा, अशा सात देशात लोकांनी क्रांती करून तेथे समाजवादी व्यवस्था आणली.समाजवादी व्यवस्था म्हणजे आर्थिक वर्ग असतील ,पण त्यांच्यातील दरी कमी असेल,त्यात फार अंतर नसेल,तसेच या व्यवस्थेत जाती नसतील,जातीविहीन व्यवस्था असेल,तसेच धर्मांना स्वातंत्र्य असेल पण सरकार ” सर्वधर्म समभाव आणि धर्मनिरपेक्ष सरकार ” या तत्वाचे काटेकोर पालन असेल.या समाजवादी व्यवस्थेत स्वातंत्र्य समानता बंधुभाव न्याय असेल,कोणावरही अन्याय होणार नाही,याचे वचन सरकार देते.परंतु या व्यवस्थेत समता या तत्वाचे पालन केल्या जात नाही.सरकार हे समाजवादी व्यवस्थेचे संरक्षण करते.
साम्यवादी व्यवस्थेत संविधानाची सारीच तत्वे काटेकोरपणे पाळली जातात.या तत्वास कुणी गद्दारी करू नये,यासाठी सरकार हुकूमशाहीचे धोरण स्वीकारते.ही हुकुमशाही तत्त्वासाठी,तत्वाचे संरक्षण आणि साम्यवादी व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठीच असते.या व्यवस्थेत खरी लोकशाही,खरा समाजवाद,आणि खरी धर्मनिरपेक्षता अमलात येते.कारण या व्यवस्थेत मालमत्तेचा हक्क अधिकार कुणीही नागरिकास नसतो,त्यामुळे प्रॉपर्टीसाठी आणि धनसंपत्ती साठवण्यासाठी बिलकुल कुणालाही संधीच नसते.प्रॉपर्टीची खरेदी विक्रीच्च होत नाही.कारण कुणाच्याही नावे जमीन कारखाना,सोने,हिरे नसतात,खनिजे नसतात यावर संपूर्ण मालकी सरकारची ( जनतेची ) असते.
यामुळे मते विकत घेता येणार नाहीत,भ्रष्टाचार ,काळाबाजार,साठवणूक,प्रॉपर्टीसाठी धोकाधडी,चोरी,मारामारी, खून होणार नाहीत.या साम्यवादी व्यवस्थेत खरी लोकशाही अस्तित्वात येईल,जी आज बेगडी लोकशाही आहे.सरकार हे लोकशाही मार्गणीच निवडले जाते.समाजवादी व्यवस्थेत समानता असते,तर साम्यवादी व्यवस्थेत समता नांदते.या व्यवस्थेत वर्ग जात बेइमानी खोटे प्रेम,आपपरभाव याचे उच्चाटन होते.खराधर्म पाळल्या जातो.धर्माच्या नावाने राजकारण आणि होणारे पाप कायमचे बंद होते.
स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय या तत्त्वांचे खरे खरे पालन व्हायचे झाले तर या तत्वांची मुळे याच साम्यवादी व्यवस्थेत रुजतील.आणि मागेल त्याला काम,रोजगार आणि गरजेनुसारच राशन मिळेल.ज्याच्यात जी क्षमता ,सुप्तगुण,कौशल्य असतील त्यास भरपूर वाव मिळेल.आपली इच्छा नसतानाही आज आपणास जे मिळेल ते काम,आणि जी मिळेल ती नोकरी करावी लागते,असे या साम्यवादी व्यवस्थेत नसेल,ज्याला त्याला त्याची आवड,क्षमता,कौशल्य यानुसारच काम,रोजगार मिळेल.उदा: ज्यात ज्या कलेचे सुप्तगुण आहेत,त्यास त्याच कलेचा रोजगार मिळेल,यामुळे तो कलाकार त्या कलेत भरारी घेऊ शकेल .ज्याची बुद्धिमता तीव्र आहे,अशी व्यक्ती अधिकारी असतील, ज्यांना उत्पादन क्षेत्रात आवड आहे,त्यांना शेती कारखान्यात काम मिळेल, ज्यांना मॅनेजमेंट कौशल्य आहे,ते व्यवस्थापनात काम करतील.
यामुळे त्यांना त्या कामात आनंद मिळेल.पाट्या टाकण्याचे काम करणार नाहीत.आज इच्छेनुसार काम मिळत नाही म्हणून लोक दिनजाव पैसा आव,असे करतात.टाळाटाळ आळस करतात,त्यामुळे देशाची प्रगती संथगतीने होते. साम्यवादात देशोन्नतीला चालना मिळून थोड्याच कालावधीत देश जगातील इतर देशाच्या पुढे असेल.आणि तत्वाचे राजकारण करणे पण सोपे जाईल.
थोडक्यात काय तर,तत्वाचे राजकारण हे त्या त्या व्यवस्थेवर अवलंबून असते,आणि जी आणि जशी व्यवस्था तसे सरकार असते.ती व्यवस्था टिकविण्याची जबाबदारी त्या सरकारची असते,नव्हे व्यवस्था टिकविण्यासाठीच सरकार असते.याचाच अर्थ असा की, संविधानाची स्वातंत्र्य समता बंधुभाव न्याय ही मूल्य ( तत्व ) , जी व्यवस्था आणि जे सरकार असेल त्यानुसार त्याची अंमलबजावणी होते.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक : 16 सप्टेंबर 2025.
फोन : 9420912209.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाची पूर्वसंध्या.


