बाळासाहेब सुतार
निरा नरशिंहपुर प्रतिनिधी..
इंदापूर तालुक्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ओढ्यांना पूर आले आहेत.
इंदापूर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने बारामती-इंदापूर रस्त्यावरील सणसर येथील ओढ्याला पूर आला आहे.
ओढ्याचे पाणी लोकांच्या घरामध्ये शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे तसेच शेतीचे नुकसान झाले आहे.पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सणसर येथे भेट देत पूरग्रस्त भागाची पहाणी करत पूरस्थितीचा आढावा घेतला.
पहाणी झाल्यानंतर कृषीमंत्री भरणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत पूरस्थितीची माहिती दिली. “सध्या पाऊस सुरू असून काहीवेळा अचानक तीव्र पाऊस पडत आहे.यामुळे ओढे-नाल्यांना पूर येत आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
इंदापूर तालुक्यातील शेटफळघडे आणि परिसरात सुमारे 156 मिलिमीटर इतका पाऊस पडल्याने
पूरस्थिती निर्माण झाली.त्यामुळे संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
ओढ्याचे पाणी लोकांच्या घरात शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांचे ड्रीप सिचनाचे साहित्य वाहून गेले आहेत.यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त शेती व नागरिकांच्या घरांचे तातडीने पंचनामे करून शासनामार्फत नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले.
सणसर येथील ओढ्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले,तर ओढ्या लगतच्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तू पाण्याखाली गेल्या.यापूर्वीही या ओढ्याला पूर येऊन नुकसान झाल्याचं मत नागरिकांनी मंत्री भरणे यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
दरम्यान,सकाळी पूरस्थितीची माहिती मिळताच स्थानिक सरपंच यशवंत पाटील, माजी सरपंच पार्थ निबाळकर, ग्रामपंचायत सदस्य,तहसीलदार जीवन बनसोडे आणि गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली.
यानंतर,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून त्वरित मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.



