दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघ या प्रबोधनपर व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या संघटनेच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या वर्षानिमित्त ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित सुरेशराव वडगावकर यांना “मराठा भूषण पुरस्कार” जाहीर झाला आहे. हा सन्मान प्रतिष्ठित पुरस्कार समारंभात नारायण महाराज जाधव यांच्या शुभहस्ते प्रदान केला जाणार असून, या सोहळ्याचे अध्यक्षस्थान हभप बापूसाहेब महाराज मोरे भूषविणार आहेत.
अजित सुरेशराव वडगावकर हे गेली अनेक वर्षे शिक्षणक्षेत्र, कला आणि क्रीडा क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहेत. शिस्त, परिश्रम, ध्यास, गुणवत्ता आणि सामाजिक बांधिलकी या पाच तत्वांवर आधारलेले त्यांचे कार्य हे आजच्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. शैक्षणिक प्रगतीसोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये व सामाजिक जाणीव रुजविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचे काम त्यांनी यशस्वीरित्या हाती घेतले. त्याचबरोबर, कला आणि क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
या पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप जगताप म्हणाले, “अजित वडगावकर यांचे कार्य हे संपूर्ण मराठा समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रात घडवलेली कामगिरी ही समाजाला निश्चितच भूषणावह आहे. त्यांच्या या कार्याचा योग्य सन्मान म्हणजेच मराठा भूषण पुरस्कार होय.”
महाराष्ट्र राज्य अध्यात्मिक व वारकरी विभागाचे अध्यक्ष बबुवान शेंडगे पाटील यांनीही वडगावकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्याची त्यांची तळमळ आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी घेतलेला ध्यास यामुळे ते समाजाचे खरे आदर्श ठरले आहेत. त्यांचा हा सन्मान सर्व मराठा समाजासाठी गौरवाचा क्षण आहे.” या पुरस्काराने वडगावकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना समाजाच्या प्रगतीसाठी पुढे अधिक कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असून, मराठा समाजाच्या इतिहासातील हा सन्मान भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.



