माणूस जेंव्हा आरशात बघतो,तेंव्हा तो आपल्या प्रतिबिंबाकडे बघतो, बघतच राहतो,स्वतःस न्याहाळतो,त्याचे लक्ष आरश्याकडे नसते,तर त्या प्रतिबिंबाकडेच असते,त्यात त्याला स्वतःच्या शरीराची कपड्याची केसाची अवस्था विस्कटलेली आहे का , याचे निरक्षण माणूस करीत असते,परंतु त्याची ही प्रतिमा आणि तिची अवस्था दाखविणारा आरसा म्हणजे व्यवस्था असते,हे त्यास समजत नाही,कारण त्याचे लक्ष फक्त आपली अवस्था नीटनेटकी कशी करावी ? आणि कधी आहे ? याकदेश असते.पण आपले हे प्रतिबिंब दाखवणाऱ्या आरशाकडे नसते.आरसा हा माणसाची अवस्था कशी आहे ते स्पष्ट आणि अचूक दाखवते,तसेच इथली आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक व्यवस्था ( आरसा ) ही माणसाची आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक अवस्था काय आहे ? आणि कशी आहे ? हे दर्शवित असते.व्यवस्था म्हणजे आरसा होय,यात माणूस स्वतःचे प्रतिबिंब बघतो,ती बिघडलेली असेल तर सुधारण्याचा प्रयत्न करतो,मेकअप पण करतो,परंतु तरी समाधान मिळत नाही,याही अवस्थेपेक्षा अजून मी चांगला आणि व्यवस्थित दिसलो असतोतर बरे झाले असते,ही इच्छा शिल्लक राहतेच. ज्यांना मेकअपचे सामान घ्यायला पैसे नसतात ते गरीब लोक ,जी आणि जशी आपली प्रतिमा आहे ,त्यावर नाखुशीने शांत होतात.
व्यवस्था ही आरशा सारखीच असते,ती या समाजाचे,देशाचे,चित्र कसे आहे ? ते दर्शविते,व्यक्तीची ,समाजाची,देशाची अवस्था म्हणजे प्रतिबिंब ही व्यवस्था दाखवून देते,जशी व्यवस्था तशी देशाची,देशातील समाजाची,माणसाची अवस्था असते.व्यवस्था ही विषमतेची असेल तर देश,समाज,माणूस विषमतेचेच जीवन जगतो.म्हणजे कुणी गरीब,मध्यम तर कुणी श्रीमंत ही आर्थिक विषमता.अनेक जाती आणि त्यांच्यात उच्चनीचता,अस्पृश्यता आणि त्यात द्वेष ईर्षा भांडणे मारामाऱ्या ही सामाजिक विषमता,अनेक धर्म आणि त्यांच्या विविध परंपरा चालीरीती,रूढीपरंपरा यातील असमानता,सर्वांना समान संधीची आणि समान दर्जाची प्रतिकुलता अशी ही सामाजिक विषमता.आर्थिक सामाजिक राजकीय समान न्याय नसणे ही विषमता,सर्वच क्षेत्रातील विषमतेची व्यवस्था म्हणजे एक प्रकारचा आरसाच होय,जो आरसा हे मानवी आणि भौतिक विषमतेचे भयावह प्रतिबिंब दाखवते.
आपले हे प्रतिबिंब दाखवणारा कोण ? याकडे माणसाचे लक्ष नसते,म्हणून तो कितीही सावरण्याचा ,मेकअप करण्याचा प्रयत्न केला तरी तो समाधानी नसतो,आपण यापेक्षाही गोरे दिसायला हवे होते ? आपली केशभूषा आणि वेशभूषा आपण कितीही नीटनेटकी करण्याचा प्रयत्न केला तरी,अजून यापेक्षाही नीट हवे होते अशी इच्छा राहूनच जाते,ही इच्छा पूर्ण कशी होणार ? कारण समाधान देणारी व्यवस्था म्हणजे समतेची व्यवस्था ( आरसा ) हवा तोच नाही.विषमतेच्या आरशात (व्यवस्थेत ) समता ( नीटनेटकेपणा ) कसा दिसणार ? यासाठी आरसाच बदलावा लागणार आहे.
लेखक : दत्ता तुमवाड.
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक :३ सप्टेंबर 2025.फोन: 9420912209.


