Home देशविदेश विरोधानंतरही,आरक्षणाचे महत्व कळू लागले,हाच लोकशाहीचा मजबूत पाया!..

विरोधानंतरही,आरक्षणाचे महत्व कळू लागले,हाच लोकशाहीचा मजबूत पाया!..

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक..

       सन १९८८-८९ मध्ये आरक्षणाचा विरोध करण्यासाठी देशभरात जनआंदोलन करण्यात आले होते.आरक्षण म्हणजे भिक आहे असेही जनमानसात रुजविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले होते.

        कारण मनुवादी विचारसरणी अंतर्गत ब्राह्मण व्यवस्थेचा प्रभाव शासन-प्रशासनात कायम ठेवण्याच्या उद्देशाने त्यावेळी आरक्षणला विरोध करण्यात आला होता.

        या मागचा हेतू एकच होता भारत देशातील नागरिकांना आरक्षणाचे महत्व कळू नये,तद्वतच देशातील नागरिकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा व त्यांच्या विचारधारेचा दिर्घकाळ विरोध करावा.

         याचबरोबर आरक्षणाचे महत्व या देशातील बहुसंख्य बहुजन मुळ निवासी नागरिकांना कळले तर ते या देशाचे शासनकर्ता बनतील आणि शासनासह प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी यशस्वी होतील याची भिती मनुवादी विचारांच्या शासनकर्त्यांना होती.

       मनुवादी व ब्राह्मणवादी विचारधारेचे सुत्रधार हे केव्हा कोणते मुद्दे घेऊन आडमार्गाने बहुजन समाजातील नागरिकांना हक्कांपासून दूर ठेवतील हे सांगता येत नाही…

         विशेषतः ते धार्मिक मुद्यांच्या आड देशातील नागरिकांच्या अधिकारांवर अंकुश लावण्यासाठी नेहमी प्रयत्न  करीत राहतात.यामुळेच अनावश्यक विचार धारेला अनुसरून धार्मीकतेची नशा बहुजन समाजातील नागरिकांना वारंवार ते चढवीत आहेत आणि यामाध्यमातून बहुजन समाजातील नागरिकांना धार्मिक नशेत बरेच वर्ष अडकवून ठेवीत आहेत असे राजकीय व धार्मिक चित्र विविध घडामोडीवरुन व घटनाक्रमावरुन दिसून येते आहे.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते,”आरक्षण,देशातंर्गत बहुसंख्य बहुजन समाजातील नागरिकांच्या सार्वांगिण उन्नतीचा मार्ग आहे आणि देशाच्या क्षमतेचा मजबूत गाभा आहे.आरक्षणाला अनुसरून त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना व संविधान सभेला पटवून दिले होते.

          “आरक्षण,सामाजिक व वैयक्तिक उन्नतीचा कणा असल्याचे देशांतर्गत विविध सामाजिक समुहाला कळणे सुरू झाले आहे.यामुळे ते आरक्षणासाठी संघर्ष करीत आहेत.या संघर्षमय घडामोडींमुळे भारतीय संविधानाचे व संविधानातंर्गत लोकशाहीचे महत्व अधिकच अधोरेखित होते.

          आरक्षण मागणिच्या संघर्षातंर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव संबंधित साहजिक समुहाने घेतले काय आणि नाही घेतले काय? याबाबत कुणीही प्रतिक्रिया देऊ नये.

     कारण ज्यांना आरक्षणाचा विरोध करायला लावला होता तोच सामाजिक समूह आरक्षण हे प्रगतीचे माध्यम आहे हे समजून घेण्यासाठी योग्य व सक्षम ठरला असेल तर आरक्षणाचे महत्व काय आहे आणि कशासाठी आहे हे सांगणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना एक दिवस तो सामाजिक समूह डोक्यात निश्चित घेईल असा आशावाद बाळगण्यात हरकत नसावी.

          डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक,जगविख्यात थोर समाजसुधारक,जगाचे ज्ञानतिर्थ, जगातील नागरिकांचे प्रेरणास्थान,वंचित-शोषीत समाजाचे उन्नत आधार व तथागत भगवान गौतम बुद्धानंतर सर्वोत्तम मार्गदाता व आधुनिक भारताच्या लोकशाहीचे निर्माता असल्याने एक दिवस भारत देशातील सर्व नागरिक त्यांना आदराने मानतील हे वास्तव आहे.

         डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी देशात मोठे षडयंत्र सुरू आहे.पण,ते युगपुरुष आणि बोधिसत्व असल्याने षडयंत्रकारी आपल्या मनसुब्यात कधीच यशस्वी होणार नाही हे सुद्धा तितकेच खरे आहे.

           म्हणूनच देशातील विविध समाज समुहाला आरक्षणाचे महत्व कळत आहे,म्हणजेच स्वतःचे अस्तित्व त्यांना कळत आहे,हाच लोकशाहीचा मजबूत पाया आहे.