अमान क़ुरैशी
जिल्हा प्रतिनिधि
दखल न्यूज़ भारत
सिंदेवाही :- नागभिड राज्य मार्गावरील मेंढा मालजवळ मोठा खड्डा पडल्यामुळे एका पाठोपाठ सात वाहनांचे अपघात झाले. यात काही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
या घटनेची माहिती नोमान पटेल (कुरेशी) यांनी पुरोगामी पत्रकार संघाला दिली. त्यानंतर संघाचे अध्यक्ष मिथुन मेश्राम, सचिव अमान कुरेशी व रोशन खानकुरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाहणीअंती रस्त्याच्या मधोमध खोल खड्डा असल्याचे दिसून आले.
दिवसा अपघात टळले असले तरी रात्री अंधारात वाहनं खड्ड्यात अडकल्याने एका कारचे टायर फुटले तर दुसऱ्या कारच्या इंजिनचे चेंबर तुटले. त्यामुळे सात वाहनांचे अपघात घडले.
तत्परता दाखवत पुरोगामी पत्रकार संघाने स्थानिक गजानन बोरकर यांच्या मदतीने मोठे झाड उपसून खड्ड्यात टाकले. त्यामुळे वाहतूक सध्या सुरळीत सुरू झाली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) तात्काळ धोकादायक खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी संघातर्फे करण्यात आली आहे. अन्यथा पुढील अपघातांची जबाबदारी PWD सिंदेवाहीवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.



