लक्षवेधी…
महेश पानसे..
अखेर भारतीय बनावटीच्या विदेशी मद्य उत्पादन शुल्क दरात वाढ करून राज्य शासनाने मद्यप्रेमींची झिंग उतरवली.
विदेशी मद्याच्या किमतीत भारी वाढ झाल्याने व जिल्हाभरातील बार मालकांनी किमतीवर 30 ते 40 टक्के सव्हिंस चार्ज लावून विक्री सुरू केल्याने विदेशी मद्याच्या किमती आकाशाला भिडल्या असून 180मि.ली.मागे 100 ते 200 रुपयाची वाढ बघता मद्यप्रेमी कमालीचे संतापले आहेत.
बार मधील गर्दी 30 त 40 टक्केनी घसरल्याने विवंचनेत सापडलेले बार मालक कमालीचे अस्वस्थ झालेले दिसतात.वाईन शॉप मध्ये 200 मध्ये मिळणारे विदेशी मद्य बारमध्ये आता 320 मध्ये घेणे साधारण मद्यप्रेमींच्या आवाक्याबाहेर असल्याने आता आम्ही ‘देशी’ मारून ‘देसाळ’ व्हायचे काय? असला संतापजनक सवाल सर्वत्र उपस्थित होऊ लागला आहे.
24 जून ला अधिसूचना काढून 25 जून 2025 पासून अंमलबजावणीचे आदेश निर्गमित करण्यात आले. या अधिसूचनेनुसार निर्मिती मुल्य दरात नवीन सूत्रानुसार भरमार वाढ होऊन त्यावरील वाढीव उत्पादन शुल्कामुळे मद्यपींना मोठा मुका आर्थिक मार बसणार आहे असे अपेक्षित होते.
बारचालकांनीही मंदीची लाट येणार हे हेरून नव्या भरमसाठ किमती विरोधात 1 दिवसीय संप सुद्धा पुकारला होता हे विशेष.
देशी दारूच्या उत्पादन शुल्कात वाढ केली नाही मात्र निर्मिती मूल्याचे सुत्र बदल करण्यात आल्याने देशी दारूच्या किमतीत किंचित वाढ झाली असून देशी सुद्धा मद्यपींना काहीशी कळवट लागत असल्याची चर्चा दिसते.
दारूच्या किमती वाढणार अशी चर्चा गत महिनाभरा पासून सुरू होतीच. किमती किती वाढतील याबाबत अनभिज्ञ असलेल्या मद्यपींना अपेक्षेपेक्षा फार मोठी खार खिशाला लागल्याचे त्यांच्या कावराबावरा होण्यावरून स्पष्ट दिसते.
विदेशी मद्याचे निर्मिती मुल्य बदलवून त्यावर उत्पादन शुल्क वाढ व त्यावर बारमालकांचे 30 ते 40 टक्के ‘सव्हिंस चार्ज’ असा तिहेरी झटका मद्यपींना बसू लागला आहे हे यावरून लक्षात येते.
विशेष म्हणजे अधिसूचना निघताच रातोरात दरवाढीचा डाव बघता शासनास वसुलीची कमालीची घाई झाली का? हा खोचक सवाल उपस्थित होत असतानाच जिल्ह्यातील काही बारमालकांनी नव्या एम.आर.पी. ची वाट न बघता वसुलीचा बेकायदेशीर फंडा सुद्धा वापरला.
स्टाॅक मध्ये असलेल्या मालावर (जुन्या मालावर) नविन निर्मिती मुल्य सूत्रानुसार एम.आर.पी.लावण्यासाठी नविन किमतीचे शिक्के त्वरित मंजूर करून जुन्या बॉटल वरील किमती सुद्धा हातोहात बदलविण्यात येणार आहेत व तसे मंजुरीचे अधिकार संबधीत उपायुक्त,अधिक्षक यांना देण्यात आले होते.
************
स्टाॅक असलेल्या जुन्या मालावरील एम.आर.पि. वर नविन एम.आर.पी.चे शिक्के मारून 31 ऑगस्ट 2025 पावेतो जुना माल संपवायचे आदेश देण्यात आले आहेत.
विदेशी मद्याचे भाव वाढविण्यासाठी नविन निर्मिती दर सुत्र व त्यावर वाढीव उत्पादन शुल्क वसूल होणार असले व ते शासन धोरणानुसार असले तरी मात्र जुन्या मालावर नविन निर्मिती दर सूत्रानुसार एम.आर.पी. घेण्याकरिता शिक्के मारून किमतीत छेडछाड करणे नैतिकतेला धरून राहील का?असाही सवाल उपस्थित होऊ लागला होता.
*************
चंद्रपूर जिल्ह्याचा विचार केल्यास विदेशी मद्याचे स्टाॅकिष्ट मोठे आसामी आहेत.यात विदेशी व देशी स्टाॅकिष्ट मध्ये दोन आमदारांचा समावेश (पाटॅनरशिप)असल्याचे बोलले जाते.जाणकारांचे मते यांचेकडे विदेशी मद्याच्या अंदाजे 50 हजारावर पेटया जुना माल असेल. याशिवाय बियरबार,वाईन शॉप मध्ये शिल्लक जुना साठा बघितल्यास एम.आर.पी.वर नविन मुल्याचे शिक्के मारुन उत्पादन शुल्क रूपात फार मोठी खिचाई मद्यपींकडून सुरू झाली हे नक्की.



