‘स्वातंत्र्य दिन’ या आपल्या राष्ट्रीय सणा निमित्त मी सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व भारतीयांचा सर्व अंगांनी विकास होओ अशी मनोकामना व्यक्त करतो. १५ ऑगस्ट हा भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस आहे. हा दिवस उगवण्यासाठी भारताच्या राजकीय स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य ध्येयवादी लोकांनी आपले बलिदान दिलेले आहे. या लढ्यासाठी संपूर्ण जीवन समर्पित केलेले आहे. असंख्य जणांच्या प्रचंड मोठ्या त्यागामुळेच भारत इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही, याचे भान स्वातंत्र्योत्तर काळात जन्मास आलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी ठेवले पाहिजे. आपण या देशाचे काही देणे लागतो, हे लक्षात ठेवून वागले पाहिजे. परंतु वर्तमानात विशेषतः जे राजकीय क्षेत्रात पुढारपण करतात ते देण्यापेक्षा सारे काही ओरबाडून घेण्यातच अग्रेसर आहेत असे दिसून येते. हे स्वातंत्र्य पुढाऱ्यांना, भांडवलदारांना सर्वसामान्यांचे शोषण करण्यासाठी मिळालेले नाही, तर सर्व जणांचे सर्वांगीण कल्याण करण्यासाठी मिळालेले आहे, याची जाणीव आता सर्वच लोकांनी पुढारपण करणाऱ्यांना व इथल्या सर्व क्षेत्रातील धनिकांना करून दिली पाहिजे. पुढारी आणि धनदांडग्यांच्या वर्तनात तत्त्व आणि व्यवहारामध्ये प्रचंड मोठे अंतर पडलेले आहे. आज स्वातंत्र्याची सारी फळे या वर्गानेच गिळून टाकलेली आहेत. आज देखील भारतात ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य द्यावे लागते, देशातील आदिवासी, भटके, दलित, तळ स्तरातील स्त्रिया यांच्या जीवनात फारसा विकास आपण घडवून आणू शकलेलो नाहीत, ही लाजिरवाणी बाब आहे. स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षात सामान्य माणसांचा अजिबातच विकास झाला नाही असे नाही तो काही प्रमाणात नक्कीच झाला. परंतु मूठभरांचा विकास गगनाला भिडला परंतु सामान्य कष्टकरी माणूस दारिद्र्यरेषेखालीच राहिला. याला जबाबदार आपल्याच बुडाखाली सारे काही ओढून घेणारे धनदांडगे आणि राजकीय पुढारी आहेत.
भारताला हे जे राजकीय स्वातंत्र्य मिळाले त्याचा लाभ बहुतांशाने इथल्या जुन्या काळातल्या सरंमजामदारांनीच घेतला. इथल्या मागास समूहातले लोक सत्तेच्या सर्वोच्च स्थानी येणार नाहीत यासाठी या लोकांनी कायम जिवाचा आटापिटा केला. आजही त्यांचा हा आटापिटा सुरूच आहे. इथले हे परंपरागत सत्ता स्थानी राहिलेले लोक कायम फोडा आणि झोडाची नीती वापरतात. सामान्य लोक कायम त्याला बळी पडतात. म्हणून सामान्यजणांचा विकास करणारी धोरणे इथे प्रमाणिकपणे राबवली जात नाहीत. म्हणून भारतातली आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढतेच आहे. जातिव्यवस्थेने निर्माण केलेली सामाजिक विषमता अजूनही संपलेली नाही. राजकीय स्वातंत्र्याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यात करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अनेकविध तरतुदी केल्या. परंतु त्या तरतुदींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणारा राज्यकर्ता वर्ग भारतातील मतदार निवडून देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सारे काही आहे, परंतु मूठभरांच्या हातात केंद्रित आहे. आणि स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही तळागाळातील भारतीय नागरीक सत्ताधाऱ्यांनी किंवा धनिकांनी दिलेल्या भिकेवर जगण्यास मजबूर आहेत.
लेखक डॉ.अनंत दा.राऊत
प्रत्येक भारतीय मुला मुलीला मोफत आणि सकस शिक्षण मिळाले पाहिजे. प्रत्येक प्रौढ भारतीयाच्या हाताला व मेंदूला काम मिळाले पाहिजे. कामाला योग्य तो दाम मिळाला पाहिजे.प्रत्येकाला स्वतःच्या मूलभूत गरजा सन्मानाने भागवता आल्या पाहिजेत. स्वाभिमानाने जगता आले पाहिजे. प्रत्येकाचा बौद्धिक विकास झाला पाहिजे. भारतात कुणीही कुणाचे शोषण करता कामा नये. कुणीही कुणालाही हीन लेखता कामा नये. कुणीही कुणावर अन्याय अत्याचार करता कामा नये, यासाठी हे स्वातंत्र्य मिळवलेले आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आपल्या देशात आदिवासी, भटके, दलित, स्त्रिया यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत. दर १८ मिनिटाला भारतात एका दलितावर अत्याचार होतो. दर आठवड्याला १३ दलितांची हत्या होते. हे क्राईम ब्युरोचे वर्तमानातील रिपोर्ट आहेत. दलित महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत. माणसाला माणसापासून तोडणारी, अधिकारांची विषम वाटणी करणारी जाती व्यवस्था संपवून टाकण्याच्या दिशेने आपण कुठलीही पावले टाकू शकलो नाही. जातिव्यवस्था ही संपवण्याची गोष्ट आहे हेच अजूनही अनेकांच्या डोक्यात येत नाही, ही फार चिंतेची गोष्ट आहे. जोपर्यंत धर्मांधतेचा व जातिव्यवस्थेचा आपण अंत करत नाही तोपर्यंत भारत एकजीव होणार नाही. जोपर्यंत भारत एकजीव होणार नाही तोपर्यंत त्याचा सर्व अंगांनी विकास होणार नाही, याचे भान स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्व भारतीय नागरिकांनी ठेवले पाहिजे. देशातले राजकीय पुढारी बिघडले म्हणून लोकही बिघडले. राजकीय पुढारी तत्वच्युत झाले म्हणून लोकही तत्वच्युत झाले. मत ही दान करायची गोष्ट असते, हे विसरून मताची विक्री करायला लागले. मताची विक्री करून पाच वर्षांसाठी आपले स्वातंत्र्य भ्रष्ट पुढार्यांच्याकडे गहाण टाकू लागले. हे जे दुष्टचक्र स्वातंत्र्याच्या काळात भारतात सुरू झालेले आहे, ते तोडावे लागणार आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जसे त्यागी नेतृत्व होते, तसे त्यागी नेतृत्व आज उरलेले नाही. सारेजण भोगी आणि चंगळवादी बनलेले आहेत. अशा चंगळवाद्यांना खरे स्वातंत्र्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल.
बाता हाणायच्या तत्त्वाच्या, मूल्याच्या, सर्वसमावेशकतेच्या, प्रेमाच्या पण वागायचे मात्र त्याच्या विरोधात ही प्रवृत्ती आता सर्वांनी सोडली पाहिजे. विचार आणि आचारात समानता येईल याची दक्षता घेतली पाहिजे. जोपर्यंत आमच्या विचारात आणि आचारात खूप मोठे अंतर आहे तोपर्यंत कुणाचीच खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य उन्नती होणार नाही, हे समजून घेऊन दक्षतेने वागले पाहिजे.
पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



