सारे जग हे शोषणावर आधारित आहे.कारण जगातील प्रत्येक देशाची समाजरचना ही वर्गीय आहे.जी शोषणातून निर्माण झाली आहे.म्हणजेच गरम मध्यम श्रीमंत हे तीन वर्ग आर्थिक शोषणातून म्हणजेच शोषण पिळवणूक यामुळे ,या कारणाने निर्माण झाले आहेत.परंतु संघर्ष मात्र गरीब आणि श्रीमंत यांच्यातच असतो.
कारण गरीबी दारिद्र्य याच्या वेदना त्रास होत असतात.मध्यमवर्गास फारसा त्रास नसतो.चिंता असते पण शारीरिक त्रास नसतो.मध्यम वर्गाचे पण श्रीमंत वर्गाकडून किंवा मालक वर्गाकडून शोषण होतच असते,पण त्याची दाहकता नसते,कारण यांचा दरमहा पगाराची ग्यारंटी असते.आणि जशी महागाई वाढेल तसा या वर्गाचा म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार वाढत असतो.म्हणून यांना शारीरिक त्रास नसतो,फक्त पगारवाढी ची चिंता असते,कारण या मध्यमवर्गास श्रीमंतवर्गात जायचे असते.यांना आपला वर्ग बदलायचा असतो.श्रीमंतवर्ग हा यांचा आदर्श असतो.मात्र श्रीमंतवर्ग हा गरीबवर्गाचा दुश्मन असतो.कारण श्रीमंत हे गरिबांचे शोषण करीत असतो.त्याच्या श्रमाचे शोषण करीत असतो.त्याच्या कष्टाचे योग्य दाम म्हणजे किंमत देत नसतो.
वस्तू निर्मितीचा उत्पादन खर्च,निर्मिती खर्च आणि वितरण खर्च वगळून बाकी जो नफा होतो,त्या नफ्यात याचा हिस्सा असतो,त्याचा हा वाटा त्यास म्हणजे उत्पादक मजूर कामगार शेतकरी यास मिळत नसतो,म्हणून हा कष्टकरी वर्ग शोषित होतो.म्हणून या शोषणाविरुद्ध तो मालक वर्गाशी लढाई करत असतो.भांडत असतो.याचा अर्थ शोषक आणि शोषित यांची लढाई ही तोपर्यन्त संपणार नाही,जोपर्यंत शोषकवर्ग हा शोषितवर्गास जमीन,कारखाना,कंपनी,व्यापार यातून मिळणारा नफा सगळ्यांना समान वाटणी देणार नाही तो पर्यंत हा शोषित आणि शोषक यांची लढाई संपणार नाही.ही लढाई संपवायची असेल तर भांडवलशाही व्यवस्था बदलून समाजवादी व्यवस्था किंवा साम्यवादी व्यवस्था स्थापन करावी लागेल.
समाजवादी व्यवस्थेत उत्पादनाची साधने म्हणजे शेती कारखाने ,जमीन,पाणी,जंगल याची मालकी खाजगी असते,पण या उत्पादन साधन यातून निर्माण होणारे प्रॉडक्ट वस्तू किंवा सेवा यावर मालकी ही राज्य सरकारची असते.त्याच्या किंमती ठरविणे,वितरण करणे हे राज्यसरकार करीत असते,यामुळे उत्पादक मजूर कामगार कर्मचारी शेतकरी यांचे शोषण होत नाही.यासच समाजवादी अर्थव्यवस्था म्हणतात.
साम्यवादी अर्थव्यवस्था म्हणजे उत्पादनाची साधने जमीन जंगल पाणी ही निसर्गसंपती आणि कारखाने कंपनी हे सारे खाजगी न राहता सार्वजनिक मालकीच्या म्हणजेच पूर्णतः सरकारच्या मालकीच्या असतात,वितरण ,व्यापार पण सरकारच्या नियंत्रणात असतात.अर्थात जी व्यवस्था ज्या देशात असते,त्या व्यवस्थेच्या विचाराचे सरकार म्हणजे सत्ता त्या देशात असते.
कारण भांडवलवादी म्हणजे पूंजी वादी सरकार असेल तर जनतेचे शोषण होणारच.कारण नफा कमावणे हे भांडवलदार जमीनदारांचे लक्ष्य असते.याचा अर्थ ज्या देशात भांडवलशाही व्यवस्था आहे,त्या देशात ती व्यवस्था टिकविण्याची काळजी घेणारे सरकार हे त्याच विचाराचे असते.म्हणून सत्तेत कोणत्या विचाराची माणसे आहेत? म्हणजे साम्यवादी विचाराची की समाजवादी विचाराची की पुन्जीवादी विचाराची माणसे निवडून जातात? त्यानुसार ती व्यवस्था अस्तित्वात असते.
म्हणून मतदारांनी ज्या व्यवस्थेत शोषण आहे.ज्याव्यवस्थेत शोषित आणि शोषक असे दोन वर्ग निर्माण होतात,अशी व्यवस्था निर्माण होऊ नये,यासाठी एक तर साम्यवादी किंवा समाजवादीच विचारांच्या उमेदवारास निवडून दिले पाहिजे,तरच शोषण थांबेल.तरच गरीब मध्यम श्रीमंत हे वर्ग निर्माण होणार नाहीत.यासाठी देव दैव धर्माचे विचार जे की विषमतावादी विचार आणि व्यवस्थेला पूरक आहेत,ते सोडून दिले पाहिजे,तरच परिवर्तन शक्य आहे.अन्यथा आज आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक या शैक्षणिक आरोग्य या प्रत्येक क्षेत्रात जी जनतेची लूट होते आहे,शोषण चालू आहे,त्यात घर न होता दरवर्षी वाढतच आहे,हे चित्र असेच चालू राहील.
जनतेची ही लूट हे आर्थिक शोषण पुढील मार्गाने चालू आहे.
महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार,काळाबाजार,नफेखोरी,साठेबाजी,अन्नधान्यातील भेसळ,अवैध धंदे चालवून,जसे की,अवैध वाहतूक, नशिले पदार्थाची तस्करी,वाळू चोरी,पाणी चोरणे,जंगल तोडणे,बार आणि बारबाला ची दुकाने चालविणे,वेश्याव्यवसाय, गुंडे पाळून त्यांचे मार्फत मोठमोठ्या चोऱ्या मारामाऱ्या खून सुपारी घेऊन करणे,धार्मिक कर्मकांडातून भक्तांचे आर्थिक शोषण,टेक्निकल शाळा,कॉलेज,वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग , डीएड, बीएड कॉलेज साठी भरमसाठ पैसे घेऊन परवानगी देणे,डॉक्टर,इंजिनियर,शिक्षक ,आणि कृषी वा अन्य कोणत्याही क्षेत्रात बेकारी वाढवून त्या बेकारी चा गैरफायदा घेणे,म्हणजेच 100 जागेसाठी एक लाख अर्ज आले की,मग कमी पगारात,जास्त तास राबवून घेऊन त्यांची पिळवणूक करून धनवान होणे,कंत्राटी पद्धत,आणि खाजगीकरण हे धोरण आखून गरजू लोकांचे शोषण करणे,हप्ते वसूल करणे,दारूचे कारखाने काढून तरुणांना बिघडून टाकणं,त्यांचे संसार उध्वस्त करणे,दारूविक्रीच्या माध्यमातून जनतेची लूट करणे,श्रमिकांच्या श्रमाची चोरी करणे,म्हणजे कमी मजुरी किंवा कमीत कमी पगारात जास्तीत जास्त तास राबवून घेणे,त्यांच्या नागरी व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे या साऱ्या शोषणाच्या वाटा आहेत.
शासनाकडे म्हणजे मरणाकडे घेऊन जाणाऱ्या वाटा बंद केल्या पाहिजेत? कुणी? तर ज्याचे शोषण होते ,त्यांनी संघटित होऊन,संघर्ष करून,उमेदवार नेते बदलून या वाटा बंद करावे लागेल.शोषितांच्या बाजूने उभे राहणारे,श्रीमंतांच्या हिताचे रक्षण करणारे आणि शोषित वंचित पिछाडीवर असलेल्या जनतेचे बहुमत घेऊन यांचे हित न जपता केवळ शोषितांचे हित जोपासणाऱ्या बहुजनांच्या नेत्यांना सुद्धा सत्तेत पाठवता कामा नये.तरच या शोषणाच्या वाटा मार्ग बंद होतील,शोषणविरहित समाजव्यवस्था निर्माण होईल.समता येईल.म्हणून विषमतेच्या वाटेने न जाता समतेच्या वाटेने चालायला शिकले पाहिजे.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक: 12 ऑगस्ट 2025.फोन: 94 20 91 22 09



