समरसता आणि समता हे दोन शब्द जरी असले तरी यांना अर्थ आहे,म्हणून या संकल्पना पण होत.संकल्पना या विचार आणि भावनाने युक्त असतात.म्हणजेच संकल्पनांना विचार आणि भावना असतात.आणि ज्या संकल्पनेत विचार कमी आणि भावना जास्त असतात,त्या संकल्पनेत भाव भक्ती श्रद्धा आणि अस्मिता असते.
समरस म्हणजे सारखा रस.रस म्हणजे रुची आवड.समरस म्हणजे सारखीच रुची आणि सारखीच आवड.सारखीच रुची किंवा आवड असलेल्या व्यक्ती एकाच सवयीची किंवा एकाच विचारांची अनेक व्यक्ती किंवा संघटना किंवा पक्ष एकत्र येतात तेंव्हा त्याची युती किंवा आघाडी होते.जसे की राजकीय क्षेत्रात काही पक्ष एकत्र येऊन युती किंवा आघाडी बनवितात.तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक संस्था संघटना एकत्र येऊन नेटवर्क बनवितात.काही जाती एकत्र येतात,विशिष्ट धेय्य साध्य करण्यासाठी ते एकी करतात.धार्मिक क्षेत्रात पण कधी कधी असे घडते.अर्थात एकत्र येणे , युती,आघाडी,संघटना, नेटवर्क,यांचा रस,आवड,दृष्टीकोन ,एकच असते.एका किमान आणि समान कार्यक्रमासाठी एकत्र येतात.तेंव्हा समरसता पूर्ण होते. एकाच धर्मातील अनेक जातीना एकत्र करणे म्हणजे धर्म मजबूत करणे या उद्दिष्टाने एकत्र येणे म्हणजे ही धार्मिक समरसता होय.वेगवेगळे संस्कार असलेल्या व्यक्ती एकत्र येणे, एकी करणे म्हणजे ही सांस्कृतिक समरसता होय.
अर्थात राजकीय ,सामाजिक,धार्मिक,सांस्कृतिक,कोणत्याही क्षेत्रातील एकता ही समरसता असू शकते,असते.पण समरसता या संकल्पनेचे वैशिष्ट्ये हे की,प्रत्येक क्षेत्रातील घटक आणि त्या घटकातील समाज जेव्हा एकत्र येतो, एकी करतो,संघटना, नेटवर्क, युती आघाडी करतो तेंव्हा त्या त्या घटकाचे अस्तित्व सोडून,विसरून किंवा नष्ट करून नव्हे,तर त्या घटकाची अस्मिता आणि अस्मिता अबाधित ठेऊनच व्यक्ती किंवा घटक सामील होत असतात.मग ते पक्ष असतील की जाती की धर्म. समरसतेत हे एकजीव नसतात तर आपले जीव साबुत ठेऊनच समरसता बनते.केवळ समरस म्हणजे आपली समान रुची म्हणून एकत्र येतात.
पण समतेत असे नसते.आर्थिक समता म्हणजे आर्थिक क्षेत्रातील सर्व घटक स्वतःचे अस्तित्व विचार दृष्टिकोन स्वभाव अस्मिता विसरून किंवा नष्ट करूनच एकत्र येतात,म्हणूनच एकजीव होतात.सामाजिक क्षेत्रातील जाती या आधी आपले अस्तित्व आणि अस्मिता नष्ट करूनच एकत्र येतात,किंवा ते भेदभाव उच्चनीचता नष्ट करण्यासाठीच एकत्र येतात,किंवा संघटन करतात.यास जातिनिर्मुलन म्हणतात.सामाजिक समता म्हणतात.धर्म विसरणे म्हणजेच धार्मिक समता होय.समता या संकल्पनेत आपली स्वतःची रुची किंवा आवड किंवा अस्मिता यास तिलांजली देऊन सामूहिक रुची सामूहिक आवड आणि सामूहिक विचार ,सामूहिक अस्मिता अस्तित्व तयार होते.व्यक्तिगत गोष्टीला समतेत थारा नसतो,कारण सामूहिक हिताताच व्यक्तिगत हित दडलेले असते.म्हणून एक विचार,एक आचरण,एक अस्मिता समतेत असते.इथे अनेक विचाराचे गाठोडे किंवा वाकळ नसते.अनेक ठिगळ एकत्र जोडलेले नसतात.तर एकाच वस्त्राची वाकल असते. अनेक रंग नसतात,तर समतेत एकच रंग असतो.तो म्हणजे लाल रक्ताचा आणि समान तत्वांचा,समान मूल्यांचा.समान उद्दिष्टांचा.
समरसता म्हणजे अनेक घटक स्वतःचे अस्तित्व शाबूत ठेऊन एकत्र येणे.आणि समता म्हणजे स्व अस्तित्वाला तिलांजली देऊन सामूहिक अस्तित्वाला मान्यता देणे होय.
वर्ग जाती धर्म वर्ण तसेच कायम ठेऊन एकत्र येणे.म्हणजेच समरसता.आणि सामाजिक एकता,अखंडता यासाठी एकत्र येणे म्हणजे समता होय.माणूस ,माणुसकी,मानवता,बौद्धिकता,वैज्ञानिकता,मानवी मूल्य आणि मानवी हक्क कर्तव्य याचे संरक्षण , भारतीय संविधानाचा उद्देश जो सकलजन हितकारी आणि सर्वसमावेशक आहे,त्याचे संरक्षण आणि जोपासना म्हणजेच समता होय.
समरसता म्हणजे स्वतःचा जीव वाचविणे आणि समता म्हणजे स्वतःचा जीव समूहाला अर्पण करणे होय.सामूहिक हिताताच माझ्या हिताचे जीवाचे संरक्षण आहे.खाजगी जीवनात माझ्या जीवास धोका आहे,याची जाणीव होणे म्हणजे समतेचा विचार होय.कातडी बचाव धोरण म्हणजेच समरसता होय.
अनेक नद्या जेंव्हा समुद्राला मिळतात तेंव्हा त्या स्वतःचे अस्तित्व विसरून ,सोडून समुद्राशी एकजीव होतात.म्हणजे सारे पाणी अलग अलग नसते,तर ते एकजीव बनून जाते,म्हणूनच त्याची विशालता,खोली,प्रसन्नता,व्यापकता ,शांतता,स्थिरता दिसून येते.सर्व जाती म्हणजे ओढे होत,जे उथळ असतात म्हणून उथळ पाण्याला खळखळाट असतो,शांतता नसते.धर्म म्हणजे नद्यांच.त्या स्थिर नसतात,आपणास स्थैर्य आणि शांतता मिळण्यासाठी समुद्रास जाऊन मिळतात.त्यात एकजीव होतात.हेच खरे माणसाचे धार्मिक जीवन होय.सामाजिक आर्थिक जीवन होय.यासच समतेचे जीवन आणि समतेचे जगणे म्हणतात.
लेखक : दत्ता तुमवाड
सत्यशोधक समाज नांदेड.
दिनांक: 7 ऑगस्ट 2025.फोन: 9420912209.



