रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
अहेरी :- गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम भागातील पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आल्याने, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) च्या व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी स्वतःचे हेलिकॉप्टर वापरून आणि ते स्वतःचालवून त्या कर्मचाऱ्याला तातडीने नागपूरला पोहोचवले.
त्यांच्या या धाडसी आणि संवेदनशील कृतीमुळे पोलीस कर्मचारी राहुल साहेबराव गायकवाड (३७) यांचा जीव वाचला.
वेळेचे महत्त्व ओळखले…
२ ऑगस्ट रोजी बी.प्रभाकरन हे गडचिरोलीमधील सुरजागड लोहखनिज खाणींच्या तपासणीसाठी हेडरी येथे आले होते.त्याच दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हेडरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक राहुल गायकवाड यांना छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना लॉईड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांना अँटीरियर लॅटरल वॉल मायोकार्डियल इन्फार्क्शन (हृदयविकाराचा झटका) आल्याचे स्पष्ट झाले.
रुग्णाची गंभीर स्थिती पाहता त्याला त्वरित विशेष हृदयोपचार रुग्णालयात हलवणे अत्यावश्यक होते.वेळ कमी असल्यामुळे स्थानिक पोलीस विभागाने तात्काळ एलएमईएलच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधून हेलिकॉप्टरची मदत मागितली.
स्वतः पायलट बनून मदत…
विनंती मिळताच बी प्रभाकरन यांनी कोणताही विलंब न करता स्वतःचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले.विशेष म्हणजे, त्यांच्याकडे विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीसाठी खाजगी पायलटचा परवाना असून त्यांना एक दशकाहून अधिक काळ उड्डाणाचा अनुभव आहे.त्यांनी आपल्या सर्व बैठका रद्द करून दुपारी २:४५ वाजता हेलिकॉप्टर हेडरी येथील हेलिपॅडवर आणले. त्यांनी स्वतः हेलिकॉप्टर उडवून रुग्णाला घेऊन नागपूरच्या दिशेने उड्डाण केले.
वेळेवर उपचार,वाचलेला जीव….
हेलिकॉप्टरमध्ये रुग्णाच्या स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी नर्सिंग कर्मचारी सोबत होते.दुपारी ३:४० वाजता हेलिकॉप्टर नागपूर विमानतळावर पोहोचले जिथे ऑरेंज सिटी हॉस्पिटलची क्रिटिकल केअर रुग्णवाहिका तयार होती.तपासणीत गायकवाड यांच्या हृदयाची एक धमनी ब्लॉक झाल्याचे आढळले. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे ४ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर यशस्वी स्टेंट सर्जरी करण्यात आली. आणि ५ ऑगस्ट रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने वेळेत दिलेली मदत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांची माणुसकी आणि धाडस यामुळे एका पोलीस कर्मचाऱ्याचा जीव वाचला.त्यांच्या या कृतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे.



