Home Maharashtra देहूफाटा येथे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी…

देहूफाटा येथे बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाकडे त्वरित कारवाईची मागणी…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी देवाचीजवळील देहूफाटा परिसरात बिबट्याचे दर्शन घडल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले व ग्रामस्थांनी केली आहे.

        शेतकरी सुभाष दाभाडे यांना त्यांच्या शेतामध्ये बिबट्या व त्याचे दोन बछडे काही अंतरावर दिसून आले. विशेष म्हणजे, या बिबट्याने त्यांच्या घरातील दोन कुत्र्यांवर हल्ला केला असून परिसरात त्याच्या उपस्थितीची ठोस चिन्हे आढळली आहेत. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि रेस्क्यु टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पाहणी करताना बिबट्याचे पावलांचे ठसे देखील पाहिले असून, परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

         ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. शेतामध्ये जाताना एकट्याने न जाणे, चार-पाच जणांच्या गटाने जाणे, हातात काठी घेणे, संध्याकाळी उशिरा शेतात थांबू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

         घटनास्थळी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, भाजपाचे माजी शहराध्यक्ष भागवत आवटे, वन विभागाचे अधिकारी अशोक गायकवाड, लक्ष्मण टिंगरे, रेस्क्यु टीमचे श्रीनाथ चव्हाण, डॉ.सायली पिलाणे, शेतकरी सुभाष दाभाडे व परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. वन विभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.