Home देशविदेश रस्त्यावरची लढाई थांबणार कधी?…

रस्त्यावरची लढाई थांबणार कधी?…

     शेतकरी वर्ग कर्ज माफ करा, मालाला योग्य भाव द्या, म्हणून मोर्चे काढतात. मजूर वर्ग हाताला काम द्या म्हणून रोजगार साठी मोर्चे करतात. तरुण वर्ग नोकरीसाठी आंदोलन करतो. विद्यार्थी परीक्षा फी आणि शिक्षण फी कमी करा म्हणून मोर्चे काढतात. बलात्कार थांबवा म्हणून महिला मोर्चा काढतात. सरकारी दवाखान्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात तेथे औषधी फुकट मिळावी म्हणून म्हणून जनता मोर्चे काढते. रस्ते वीज पाणी या नागरी सुविधा साठी पण जनता रस्त्यावर उतरते. राशन दुकानातून राशन नियमित मिळावे आणि ते निकृष्ट मिळू नये यासाठी पण जनता रस्त्यावर उतरते. 

       केंद्र आणि राज्य सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे जाहीर केलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या अनेक योजना उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक साठी च्या योजना, श्रावणबाळ योजना, अपंगासाठीच्या योजना, मागासवर्गीय महामंडळाच्या अनेक योजना किंवा कर्ज, वृद्ध कलावंतासाठीची योजना, निराधारांसाठीच्या योजना, तसेच बँकांमार्फत देण्यात येणारे कर्ज, यासाठी तालुकास्तरावरील तहसील कार्यालय, पंचायत समिती, बँका, त्यांचे समोर नेहमीच उपोषण धरणे सत्याग्रह मोर्चे, रास्ता रोको, कलेक्टरला अनेक वेळा अनेक विषयावर अनेक शिष्ट मंडळात द्वारे निवेदने देणे, इत्यादी आंदोलनाच्या गोष्टी ह्या चालूच राहतात. 

     समाजातील विविध घटकांचे विविध प्रश्न आणि त्यासंबंधी त्यांची रस्त्यावरची लढाई रोज देशात कुठे ना कुठे चालूच असते. 

        याशिवाय बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई टंचाई साठेबाजी दादागिरी अन्याय अत्याचार दारूबंदी या विषयावर किंवा या समस्यांवर पण नेहमीच जनता आंदोलन करताना दिसून येते. कारण या सर्व गोष्टीमुळे जनता त्रस्त झालेले असते, त्यांना या सर्व समस्या सहन झाल्यामुळे जनता पेटून उठते आणि रस्त्यावर येते. 

    परंतु या समस्या संबंधी रस्त्यावरची लढाई आपण किती दिवस लढायची,? याचा विचार मात्र जनता करत नाही की नेते करत नाही की विचारवंत सुद्धा यावर विचार करताना दिसत नाहीत. म्हणूनच तर अनंत काळापासून लोक त्यांच्या समस्या आणि त्यांची लढाई आणि त्याबद्दल राजकर्त्यांची दुर्लक्ष हे चाललेलेच आहे. पण अशी किती दिवस चालायचे किंवा चालू द्यायचे किंवा चालू ठेवायचे,? याचा विचार कोणीतरी कधीतरी करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातोय, ही परिस्थिती कायमच राहणार आहे. असे जर झाले तर मग एक दिवस असा येणार आहे की सारी जनताच असा विचार करेल की,” रोज मरे त्याला कोण रडे “? आणि असा दिवस ज्या दिवशी उघडेल त्यादिवशी अंत हा ठरलेला आहे, हे निश्चित. अंत हा केवळ समाजाचाच नव्हे तर समाजाची जबाबदारी असलेल्या विचारवंतांचा आणि राजकर्त्यांचा पण होणार हे निश्चित च. 

      वस्तुस्थिती ही आहे की, यांच्या समस्या आहेत तेच लोक रस्त्यावरची लढाई करत असतात, आणि ज्यांच्या समस्या नाही ते लोक आयुष्याला मी जीवन जगत असतात, त्यांना जीवन संघर्ष करायची गरज पडत नाही, उदाहरणार्थ गर्भ श्रीमंत मध्यम क्लास वन क्लास टू अधिकारी. त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे भरपूर धनसंपत्ती असल्यामुळे, सर्व सुख सुविधा असल्यामुळे त्यांना संघर्ष कराची वेळच येत नाही. हे सर्वांना माहीत असताना, समाजाच्या सर्वच स्तरातील लोकांना किमान मध्यमवर्गीय जीवन जगता येईल असे नियोजन सरकार का करत नाही ? हा खरा प्रश्न आहे, याबद्दल सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. कर्मचाऱ्यांचा निष्क्रियपणा आणि राजकर्त्यांचा बेजबाबदारपणा यास कारणीभूत ठरतो. किमान भिकाऱ्यांना भीक द्यावी तशी लाचार जनतेला सामाजिक न्यायाच्या छोट्या छोट्या योजना सुद्धा लोकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता या प्रशासनात आणि सरकारमध्ये नाही हे या रोज होणाऱ्या रस्त्यावरच्या लढाया यावरून सिद्ध होते. 

        खरे तर, ज्याचे पोट दुखते, त्यांनीच ओवा खायचा असतो, म्हणून रोज उठून आंदोलन करीत बसण्यापेक्षा, आंदोलन करण्याची आपल्यावर पाळी का येत आहे? आणि ज्या समस्या निर्माण होत आहेत किंवा झालेले आहेत, त्या का निर्माण झालेल्या आहेत कोणी केलेले आहेत ? त्याची कारण मीमांसा करून त्यावर उपाय पण करण्याचा विचार जनतेनेच करायला पाहिजे. पण असे होताना दिसत नाही, समजा जनता तर अज्ञानी अडाणी अंधश्रद्धाळू धर्मांध भोळी भाबडी आहे, परंतु किमान जे कार्यकर्ते मोर्चाचे नेतृत्व करतात, रस्त्यावरची लढाई करण्याचे नियोजन करतात, किमान त्यांनी तरी या सर्व समस्यांचे मूळ शोधायला पाहिजे, आणि त्यावर उपाय म्हणून कृती कार्यक्रम केला पाहिजे, म्हणजेच थोडक्यात असे की, आपल्याला आंदोलन का करावे लागते ? तर अनेक समस्या असल्यामुळे, मग ह्या समस्या निर्माण होण्याची कारणे काय ? ती कारणे शोधून काढून, त्यावर कोणते उपाय करावे लागतील ? याबद्दलची जनजागृती करण्याची गरज आहे. नेमकं होतंय काय, की, रोग आहे, आणि तो रोग कशामुळे आहे ? नेमकं ह्याचं निदानच होत नाही, म्हणून या रोगांवर फक्त मलमपट्ट्या करण्याचे काम चाललेला आहे, केवळ सामाजिक न्याय मंत्रालय स्थापन करणे, अनेक योजना निर्माण करणे, आणि त्या सर्वांचीच गरज पूर्ण करतील असे नाही, उदा. शौचालय किंवा घरकुल योजना, लाभधारकांची सर्वे करून यादी तयार केली, परंतु गावातील सर्वच लाभधारकांना एकाच वेळी सर्वांनाच घरे किंवा शौचालय दिल्या जात नाही तर दरवर्षी त्यापैकी थोड्या थोड्यांना दिला जात, त्यामुळे भ्रष्टाचाराला संधी मिळते, आणि हेच तर प्रशासन आणि सरकारला करायचा असते म्हणून त्यांचे असे हे नियोजन असते, हे सगळ्यांच्या लक्षात येत नाही, अशा अपुरे आणि तोकड्या नियोजनामुळे लोकांमध्ये भांडणे लागतात, त्याचा फायदा राजकारण्यांना निवडून येण्यासाठी होतो. हे कळून सुद्धा, गरजवंतांना अक्कल नसते म्हटल्याप्रमाणे गरजवंत हे स्वार्थी असल्यामुळे आधी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असतात, यातून या साऱ्या समस्या निर्माण होत असतात. 

   आपल्या समस्या आणि त्यासाठी दरवर्षी रस्त्यावरची लढाई करायची गरज पडणार नाही यासाठी काय केलं पाहिजे यावर चिंतन होणे अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर हे रोग कायमच राहतील आणि त्यावरचे इलाज म्हणजे फक्त मलमपट्ट्या करणे हाच असेल, आणि केवळ मलमपट्ट्या करून रोग बरे होत नसतात, तर त्या रोगाचे मूळ शोधून ते मूळ नष्ट करणे हाच खरा उपाय होऊ शकतो. म्हणून रोगांची मूळ आणि त्यावर कायमचा उपाय यावर कार्य करण्याची समाज सुधारकांची खरी गरज होऊन बसते. 

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक: 24 जुलै 2025.फोन: 9420912209.