Home Maharashtra साकोली शिवाजी वार्ड तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पात ३ कोटींचा घोटाळा,स्थानिकांचा संताप…

साकोली शिवाजी वार्ड तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पात ३ कोटींचा घोटाळा,स्थानिकांचा संताप…

ऋग्वेद येवले

  उपसंपादक

दखल न्यूज भारत 

साकोली : येथील शिवाजी व पंचशील वार्डातील तलाव सौंदर्यीकरण प्रकल्पात ३ कोटी रुपये खर्चूनही काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सुसज्ज जागा उपलब्ध होणार होती. मात्र, सदर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

      या प्रकरणी स्थानिक नेते, राजकारणी, मुख्य अधिकारी आणि पत्रकार यांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, प्रकल्पाशी संबंधित अधिकारी आणि काही व्यक्तींनी पैशांचा गैरवापर केला आहे. यामुळे प्रकल्पाचे काम पूर्णपणे खराब झाले असून, तलाव परिसराची दुरवस्था कायम आहे. याबाबत कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे स्थानिकांनी नमूद केले आहे.

     स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करताना, या प्रकरणात जबाबदार असलेल्यांना उत्तर द्यावे लागेल, अशी मागणी केली आहे. तसेच, जोपर्यंत तलाव आणि वार्ड परिसराची सुधारणा होत नाही, तोपर्यंत मतदान आणि मत देण्याचा निर्णय घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.

     या घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा याबाबत काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.