दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत झारखंड येथील ‘रॉकवेल ऑटोमोशन’ कंपनीच्या सीएसआर निधीतून १० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाची यशस्वी उभारणी करण्यात आली.
हॅबिटॅट इंडिया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सौरऊर्जा निर्मितीचा उपक्रम राबवण्यात आला असून, पर्यावरण संवर्धनासोबतच ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना अखंड वीज उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कंपनीचे विभागीय व्यवस्थापक बुरानउद्दीन बोहरा व प्रोग्रॅम मॅनेजर सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प प्रत्यक्षात आला. विद्युत तांत्रिक सहकार्य टेक्निशियन राहुल सागर यांनी दिले.
प्रकल्पाचे उद्घाटन शेखर महाराज जांभुळकर, भारती सहकारी बँकेचे अध्यक्ष बी.बी.कड, आणि भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ.दीपक पाटील, विश्वस्त एल.जी.घुंडरे, प्राचार्य एस.जी.मुंगसे व मुख्याध्यापक प्रदीप काळे उपस्थित होते.
वारकरी सांप्रदायातील व ग्रामीण पार्श्वभूमीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेने दाखवलेली तळमळ, शैक्षणिक गुणवत्ता, समाजोपयोगी उपक्रमांतून केलेले योगदान आदी घटक लक्षात घेऊन देशभरातील १०० शाळांमधून श्री ज्ञानेश्वर विद्यालयाची निवड करण्यात आली.
या उपक्रमामुळे सौरऊर्जेच्या प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण मिळणार आहे. ‘रॉकवेल ऑटोमोशन’ कंपनीच्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणाला दिलेल्या हातभाराचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी कौतुक केले.



