Home Maharashtra रांगेबाहेरून दर्शन दिल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल : जिल्हाधिकारी ...

रांगेबाहेरून दर्शन दिल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल : जिल्हाधिकारी  — व्हीआयपी संस्कृतीला ब्रेक, भाविकांचा सन्मान…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर नगरीत लाखो भाविकांचा महापूर आलेला आहे. संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना, विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या सामान्य भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

       जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कोणत्याही प्रकारच्या व्हीआयपी दर्शनावर बंदी घालणारा आदेश जारी केला आहे. कोणत्याही व्यक्तीला – ती राजकीय, प्रशासकीय किंवा सामाजिक दर्जाची असो – रांगेबाहेरून दर्शन दिल्यास राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. अनेक वेळा असे घडत असे की काही व्हीआयपी व्यक्तींना मागील प्रवेशद्वार अथवा खास मार्गाने दर्शन दिले जात असे. त्यामुळे रांगेतील सामान्य भाविकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागे आणि नाराजी निर्माण होत असे. हा अन्याय दूर करण्यासाठी यंदा प्रशासनाने “सर्वांसाठी एकसमान व्यवस्था” हे धोरण ठामपणे राबवले आहे.

       “वारी ही भक्तीची व समतेची शिकवण देणारी परंपरा आहे. तिच्या मूळ तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे.” असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले आहे.

भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

     या निर्णयाचे भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.“यंदा खरं दर्शन मिळतंय. कोणी मागून घुसत नाही, सगळे आमच्यासोबतच उभे आहेत. प्रशासनाचे आभार,” असे बोलताना अनेक वारकऱ्यांच्या डोळ्यांत समाधान होते.

       दरवर्षीप्रमाणे यंदाही संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, आणि गजानन महाराज यांच्या पालख्या मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. रस्त्यावर वारकऱ्यांचे स्वागत करणाऱ्या ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी पाणी, फराळ, औषधोपचार व आरोग्य तपासणी शिबिरांची व्यवस्था केली आहे. पंढरपूर शहरात रांगेतील भाविकांसाठी प्रशासनाने पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, छायाच्छादन, शौचालयं आणि विश्रांती केंद्रांची उत्कृष्ट व्यवस्था उभारली आहे. यंदाची वारी ही फक्त भक्तीची नव्हे, तर समतेचा, शिस्तीचा आणि सामाजिक सजगतेचा संदेश देणारी एक आदर्श वारी ठरत आहे.

 मुख्य ठळक बाबी…

१) कोणत्याही प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद.
२) आदेश न मानणाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई.
३) रांगेतील सर्व भाविकांना समान सुविधा.
४) भाविकांच्या समाधानाला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद.
५) वारी व्यवस्थापनात आधुनिक नियोजन व सहकार्य.