Home Maharashtra हर घर जल योजनेचे लाखो रुपये जलकुंभात व्यर्थ… – मलींदा खाण्यासाठीच...

हर घर जल योजनेचे लाखो रुपये जलकुंभात व्यर्थ… – मलींदा खाण्यासाठीच राबविली योजना.. – संपूर्ण आरमोरी तालुक्यांतीलच हर घर जल योजना कुचकामी…

ऋषी सहारे 

  संपादक

आरमोरी तालुक्यातील जोगिसाखरा गट ग्रामपंचायत सालमारा येथील नागरिकांना नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले.

           प्रत्येक घराला पाणी मिळावे यासाठी घरोघरी नळ बसवण्यात आले. मात्र नळाला आजपर्यंत पाणी येऊ शकले नाही. परिणामी गावाला दरवर्षी तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागलेला नाही.

          ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येतात. त्यानुसार आरमोरी तालुक्यातील सालमारा येथे पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली.

          लाखो रुपये खर्च करून जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम झाल्याने गावकऱ्यांची पाण्यासाठीची वणवण थांबेल, असे वाटत होते. मात्र अजूनपर्यंत नळाला पाणीच पोहोचलेले नाही.

            इतका पैसा खर्च करून देखील पाण्यासाठीची वणवण थांबत नसेल तर ही योजना म्हणजे केवळ मलिंदा लाटण्यासाठी केलेला खटाटोप तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

            बांधकाम करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना केवळ शोभेची वास्तू ठरली आहे. जिल्हा प्रशासनाने सदर पाणीपुरवठा योजना त्वरित कार्यान्वित कशी करता येईल, याकडे लक्ष देण्याची मागणी सालमारा येथील नागरीकातून केली जात आहे.

            दोन वर्षा पूर्वीपासून घर घर नळ या द्वारे सुंदर सिमेंट रस्ते फोडून घर घर नळ दिले खरी पण त्यात पाणी येईल कधी हा प्रश्न अनुत्तरितच आहे त्याच बरोबर खराब केलेले रस्ते दुरुस्त कोण करणार हा ही प्रश्न अनुत्तरितच आहे.

          या संदर्भात सबंधित अभियांत्याशी बोलणी केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली जात आहेत. संपूर्ण आरमोरी तालुक्यात बोंब असून हर घर जल ही योजनाच कुचकामी असल्याचे बोलले जात आहे.

          कंत्राट दारा सोबतच सबंधित विभाग पण मलिंदा खाऊन गप्प तर नाही ना असे बोलल्या जात आहे.

 विहिरीवरून आणावे लागते पाणी…

            दरम्यान, पाणीपुरवठा योजना मृतावस्थेत असल्याने गावातील महिलांना पाण्यासाठी विहिरीवरून पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत दमछाक करावी लागत आहे. गावातील महिलांना विहिरीतून काढलेले पाणी डोक्यावरून घरापर्यंत आणावे लागत आहे. 

          वरिष्ठ अधिकारी  वर्गाचे लक्ष नसल्याने ही परिस्थिती उद्भभवल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.