शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल तर यापेक्षा लज्जास्पद काहीही नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा काळ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे असा गंभीर आरोप काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार विधानभवनाबाहेर बोलताना म्हणाले, म्हणाले, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आहे. आमचे पाच मंत्री काय करतायत, काय चाललय या सरकारमध्ये? उभा धिंगाणा सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातला रोज व्यायाम करणारा एक पैलवान मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो. दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्याच्यापुढे जाऊन 10 हजार रुपये दंड भरुन माफी मागतो. मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेच्या मागे लागतो, ब्लॅकमेल करतो” असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, एकतर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री, माजी राष्ट्रपतींची जमीन ढापतो. म्हणजे कल्पनाच करु शकत नाही. केवढी हिम्मत या मंत्र्यांची. पहिल्या महिला राष्ट्रपती, त्यांची 26 एकर जमीन. वरती मंत्रिमंडळात हा मंत्री मान वर करुन फिरतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे. मंत्रिमंडळात यांना मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आहे. कोकाटेंचा बाकी आहे. आज हा विषय घेऊ. काल जी घटना घडली, त्यावर अबू आझमी आणि भाजपने मुख्य मुद्यावरुन पळवाट काढण्यासाठी मॅच फिक्सिंग केली होती” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. “अबू आझमींच्या मागे सध्या जे काही सुरु आहे, त्यातून बचावासाठी आझमींनी भाजपने दिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवल्याचाही आरोप त्यांनी केला.



