(१) कपिल (इ.स. पूर्व ७ वे शतक) सांख्य दर्शनाचा (तत्त्वज्ञानाचा) प्रवर्तक. सुष्टी ईश्वरनिर्मित नसून ती पुरुष व प्रकृती या दोन तत्त्वांपासून ठरावीक क्रमाने निर्माण होते व नाश पावते असे मत मांडले.
(२) कश्यप उर्फ कणाद (इ.स. पूर्व ६ वे शतक) : वैशेषिक दर्शनाचा प्रवर्तक, ‘वैशेषिक सूत्रे’ या ग्रंथात याने सृष्टीतील सर्व पदार्थ सूक्ष्म कणांपासून बनले आहेत. हे कण म्हणजेच अणू अविभाज्य, नित्य व अविनाशी आहेत. या कणांचे म्हणजे अणूंचे भंजन करणाऱ्यास पस्तावण्याची पाळी येईल असे त्याने मत मांडले. तसेच त्याने पदार्थांची रचना व २४ गुणधर्म सांगितले. म्हणून त्यास अणुशास्त्रज्ञ व पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ म्हणतात. कणादने आरंभवाद (प्रत्येक घटनेस कारण असते) हा सिद्धांत मांडला.
(३) सुश्रुत (इ.स. पूर्व ५ वे शतक) : या वैद्यकशास्त्रज्ञाने ‘सुश्रुतसंहिता’ या ग्रंथात ११२० रोगांची लक्षणे, पथ्य, शस्त्रक्रिया, आरोग्यशास्त्र वैद्यांचे शिक्षण इ. चे विवेचन केले आहे. तो मोतिबिंदू, हर्निया, त्वचारोपण कृत्रिम नाक बनवून ते चेहऱ्यावर बसविणे (प्लॅस्टिक सर्जरी) इ. शस्त्रक्रिया करीत असे. त्याने शवविच्छेदनाचे महत्त्व व गरज पटवून दिली.
(४) जीवक (इ.स. पूर्व ५ वे शतक) हा मगध राजा बिंबिसार व राजा अजातशत्रू यांच्या दरबारी राजवैद्य होता. तो पोटातील व डोक्यातील शस्त्रक्रिया करण्यात प्रवीण होता. त्याने गौतम बुद्धांच्या पोटाचा विकार बरा केला होता.
(५) चरक (इ.स. २ रे शतक) सम्राट कनिष्काच्या दरबारी राजवैद्य होता. चरकसंहिता या वैद्यकशास्त्रावरील ग्रंथात त्याने औषधशास्त्र आहार, पथ्यापथ्य, रोगचिकित्सा, शरीरसंवर्धन व रोगोपचार पद्धती इ. चे. विवेचन केले आहे.
(६) आर्यभट्ट (इ.स. ४७६ ते ५५०) हा गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होता. त्याने वर्गमूळ, घनमूळ व वर्गसमीकरणे सोडविणे यांच्या पद्धती शोधून गणितशास्त्राचा पाया घातला. ‘आर्यसिद्धांत’ या खगोलशास्त्रावरील ग्रंथात ‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ असा सिद्धांत मांडला, त्याने एका वर्षाचा काळ ३६५ दिवस १५ घटी, ३१ पळे व १५ विपळे असा दिला आहे. आधुनिक तज्ज्ञांनी वर्षाचा जो कालावधी काढला आहे तो आर्यभट्टाच्या कालावधीपेक्षा फक्त ३ मिनिटे व १९ सेकंदानी अधिक आहे.
(७) वराहमिहीर (जन्म इ.स. ४९०) : खगोलशास्त्रज्ञ. पंचसिद्धांतिका या ग्रंथात प्रत्येक ग्रहाचे पृथ्वीपासूनचे अंतर दिले आहे. पृथ्वी चेंडूसारखी गोल असून ध्रुवाजवळ चपटी आहे असा सिद्धांत मांडला.
(८) ब्रह्मगुप्त (इ.स. ५९८ ते ६६५) : खगोलशास्त्रज्ञ. ब्राह्मस्फुट ग्रंथ लिहिला. पृथ्वीच्या ठिकाणी सर्व पदार्थांना आकषून घेण्याचा गुणधर्म असल्याने ते जमिनीवर पडतात, हा न्यूटनचा सिद्धांत मांडला. त्याने गणितातील शून्याची संकल्पना विशद केली. या गणितशास्त्रज्ञाने आर्थिक देवघेव व व्याज व्यवहार यात अंकगणिताचा वापर केला. हा बीजगणितात ऋणात्मक संख्यांचे नियम ठरविणारा पहिला भारतीय आहे.
(९) नागार्जुन (इ. स. ५ वे ते ६ वे शतक) या वैद्यकशास्त्रज्ञाने ‘उर्ध्वपातन’ (distillation) पद्धतीचा शोध लावला. सौम्य क्षारांचे तीव्र क्षारांत रूपांतर करून अनेक जंतुनाशके बनविली. चिनी प्रवासी ह्युएन त्संगने नागार्जुनचा आपल्या ग्रंथात गौरव केला आहे.
(१०) भास्कराचार्य: (इ. स. 10 वे शतक) या गणितज्ञाने ‘सिद्धांतशिरोमणी’ व ‘लीलावती’ हे ग्रंथ लिहिले. वर्ग समीकरण, एक सामायिक समीकरण, वर्गमूळ, घनमूळ, त्रिकोणमिती, क्षेत्रफळ, घनफळ इ. चे विवेचन केले आहे.
मात्र दहाव्या शतकानंतर गेल्या एक हजार वर्षात एकही शास्त्रज्ञ वा गणितज्ञ भारतात जन्माला का आला नाही याचे कारण काय असावे बरे? या शास्त्रज्ञांनी केलेल्या मूलभूत संशोधनाचा आधार घेऊन आपण आणखीन मोठी झेप विज्ञानात का घेऊ शकलो नाही? जरा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, त्यानंतर भारतीय समाज हा जातीपाती आणि अंधश्रद्धांमध्ये ढकलले गेला. ब्राह्मण समाजाने देवाधर्माच्या नावाखाली बहुजनांना मानसिक पंगू बनवण्यासाठी कर्मविपाक सिद्धांत त्यांच्या गळी उतरवला. शिक्षणाची बंदी केली आणि मनुस्मृतीचे नियम हाच आपला धर्म आहे, असे सांगत लोकांमध्ये ते नियम घट्ट रुजवले. त्यातून धार्मिक कर्मकांड वाढले. ब्राह्मणांनी बहुजनांना देवाधर्माची भीती दाखवून वैदिक श्लोकांची पोपटपंची करत कुठलेही श्रम न करता आयते खाण्यासाठी आपल्या पोटापाण्याची सोय केली. (कितीही नाही म्हटले तरी हा सत्य इतिहास झाकता येणे शक्य नाही.) अशा वेळेस निरक्षर जनतेमध्ये पूर्वजन्मीचे भोग, नशिब अशी मानसिकता रुजली नसती तरच नवल! मग माणसाला प्रश्न ते कसे पडणार, जिज्ञासा ती कशी निर्माण होणार आणि नवनवीन शोध ते कसे लागणार!!
पण कालांतराने हेही दिवस गेले, ते भारतात इंग्रज आल्यानंतरच. 19 व्या शतकात इंग्रजांनी आधुनिक शिक्षणाच्या शाळा सर्वांसाठी खुल्या केल्या. त्यामुळे बहुजन नवीन ज्ञानामुळे विचार करू लागले. त्यांना ब्राह्मणी कावा कळला. हळूहळू ब्राह्मणांची सद्दी संपुष्टात येऊ लागली. मगच जगदीशचंद्र बोस, सी व्ही रमण, सुरेशचंद्र रे, श्रीनिवास रामानुजन, यासारखे आधुनिक शास्त्रज्ञ जन्माला आले. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी होमी भाभा, विक्रम साराभाई, शांतीस्वरूप भटनागर, प्रशांतचंद्र महालनोबीस, अशा विद्वान शास्त्रज्ञांना हाक देऊन भारतात आणले. त्यांना शास्त्रीय संशोधनासाठी संशोधन संस्था काढून दिल्या. मग भारत शास्त्रीय जगतात हळूहळू प्रगती करू लागला. द्रष्ट्या नेहरूंच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळेच आज भारत अवकाश संशोधनात भरारी मारत आहे आणि अण्वस्त्र सज्जही झाला आहे.


