पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचं सगळं काम सुरळीत सुरू आहे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… — आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात लाखो वारकऱ्यांची मांदियाळी दाखल…

दिनेश कुऱ्हाडे

  उपसंपादक

      पंढरपूर : बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला घातलं, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. पांडुरंगाच्या आशीर्वादाने राज्याचं सगळं काम सुरळीत सुरू आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे सांगितले.

       आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक सह कुटुंब पांडुरंगाची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील काळे दांपत्याला शासकीय पूजेचा मान मिळाला.

       भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून पंढरपूरची पायी वारी करत आहेत. आज त्यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. विठ्ठलाची पूजा करण्याचा सर्वात आधी मान मिळाल्याने आम्ही धन्य झालो, असं भाऊसाहेब काळे म्हणाले. तर बा विठ्ठला. तुझ्या आशीर्वादाने सर्व सुरळीत होऊ दे, असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाला घातलं.

       आज पहाटेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि कुटुंब यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत नगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे आणि मंगल काळे यांना शासकीय पूजेचा मान मिळाला. भाऊसाहेब काळे हे 25 वर्षापासून वारी करत आहेत. देवगड ते पंढरपूर भास्करगिरी महाराज यांच्या सोबत काळे दांपत्य पंढरीची वारी करतात. भाऊसाहेब काळे व्यवसायाने शेती करतात. काल आठ तास दर्शन रांगेत काळे दांपत्य उभे होते.

   काळे दाम्पत्यांचा सत्कार

    श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची महापूजा झाल्यानंतर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, तानाजी सावंत, दिपक केसरकर, खा.श्रीकांत शिंदे, आ. समाधान अवताडे‌ तसेच मानाचे वारकरी श्री व सौ भाउसाहेब काळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काळे दाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला.

       यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की पांडुरंगाची भक्तीभावे पूजा केल्यानंतर विठ्ठलाकडे राज्याच्या भल्याचं साकडं घातल्याचं ते म्हणाले. सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी पूजा करण्याची मला संधी मिळाली मी माझे भाग्य समजतो.

     शिंदे यावेळी म्हणाले,’आषाढी वारीत वारकऱ्यांच्या आरोग्याला शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी तीन ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरातून भाविकांची आरोग्य सेवा करता आली हे आमच्यासाठी विठ्ठल पुजेसारखेच आहे. या वर्षीच्या वारीत स्वच्छतेचे चांगले काम झाले आहे. शासनाने दिलेल्या सूचनांनुसार प्रशासनाने उत्तम नियोजन करून वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आलेल्या वारकऱ्यांचा मुख दर्शनाच्या रांगेत शासकीय पूजेच्या वेळात खोळंबा होवू नये म्हणून या काळात मुख दर्शन रांग सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रांगेतील वारकऱ्यांचे दर्शन जलद व सुलभ झाले’.

    ते पुढे म्हणाले,’पंढरपूर नगरपरिषदेकडील कामांसाठी नगरोत्थानमधून १०८ कोटी आणि शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी १०९ कोटी रुपयाच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. याबरोबरच आणि मंदिर आराखड्यासाठी ७३ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पंढरपूर शहर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन तयार करण्यात येईल. तसेच, ३० खाटांचे रूपांतर १०० खाटांमध्ये लवकरच करण्यात येईल’.

      दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेला वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झाला. अवघी पंढरी विठोबा, पांडुरंग, विठुराया नावाने दुमदुमून गेली. लाखोंच्या संख्येनं भाविक पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लीन झाले.