आळंदीत मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू :- महिलांचा व वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक

आळंदी : २६ ऑक्टोबरपासून आळंदी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू असून त्यामध्ये आळंदी आणि परीसरातील अबालवृद्धांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच महिला व तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. संपूर्ण आळंदी आणि परीसरात मराठा आरक्षण ही एकच चर्चा सुरू आहे.

         अंतरवाली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे मराठी समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला राज्यातून मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना फलटण शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधवही आता मागे नाहीत. मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज माध्यमातून करण्यात आलेल्या नियोजनानुसार साखळी उपोषणासाठी अनेक तरुण उपोषणात सहभागी होत आहेत. आता नाही तर कधीच नाही, आरक्षण आमच्या हक्काचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय यासारख्या गगनभेदी घोषणा देत विशेषतः महिला आणि तरुण वर्ग अत्यंत शिस्तीने व शांततेने आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत.

           आज तिसऱ्या दिवशी श्रीमंत भारत ग्रुपचे दादासाहेब करांडे आणि युवा नेते संदीप पगडे साखळी उपोषणाला बसले असुन या वेळी रोहीदास तापकीर, डि.डि.भोसले, रमेश गोगावले, पांडुरंग वहीले, गोविंद महाराज गोरे, पुष्पा कुऱ्हाडे, अजय तापकीर, विनोद कांबळे, अरुण बडगुजर, डॉ.सुनिल वाघमारे, संगिता फपाळ, मंगल हुंडारे, संगिता कंकाळे, किरण बवले, मंगेश काळे, बजरंग वहीले यांनी उपोषणस्थळी भेट दिली.

             विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामध्ये आळंदी जनहीत फौंडेशन, इंद्रायणी सेवा फौंडेशन, आळंदी धाम सेवा समिती, श्री.राम वारकरी शिक्षण संस्था, यशवंत संघर्ष सेना, सिद्धार्थ ग्रुप, शिवतेज मित्र मंडळ, आळंदी बृम्हवृंद अनुष्ठान मंडळ वगैरे असंख्य संघटनांचा समावेश आहे.

           मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला फलटण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ३० हून अधिक गावात नेत्यांना तसेच राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर पूर्व भागातील अनेक गावांमध्ये मराठा आरक्षणाचा एल्गार पुकारला आहे. आज उपोषणस्थळी वारकरी साधकांनी हजेरी लावत टाळमृदूंगाच्या गजरात भजन, हरीपाठ करीत सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभाग घेतला. दरम्यान, आज तिसर्‍या दिवशी चर्होली खुर्द, मरकळ, केळगाव, डुडुळगाव, धानोरे, सोडू अनेक गावातील हजारो मराठा बांधव साखळी उपोषणाला भेट दिली.