विद्यार्थ्यांनी जाळला ‘तो’ कंत्राटी पदभरतीचा जीआर….  — गोंडपिपरी येथील तरुण उतरले रस्त्यावर…. — शिवसेना व कॉंग्रेसही आली सोबतीला….

प्रितम जनबंधु

   संपादक 

          कंत्राटी पदभरतीचा शासनाने घेतलेला निर्णय हा तरुणांना गुलामगिरीत लोटणारा असल्याचे सांगत स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले आणि शासनाने काढलेला जीआर जाळून टाकला.या विद्यार्थ्यांच्या सोबतीला शिवसेना आणि कॉंग्रेस धावून आली. 

               राज्यातील येणार्‍या निवडणुका लक्षात घेता सरकारने महापदभरती काढली आहे. १० वर्षानंतर पहिल्यांदाच जम्बो पदभरती निघाल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-यात आनंद पसरला असुन नोकरी मिळावी याकरिता विद्यार्थी जीव ओतून अभ्यास करीत आहेत. सरकारने महापदभरती काढली असली तरी दुसरीकडे यापुढे कंत्राटी पद्धतीने पदभरतीचा निर्णय घेतला.

            या निर्णयाने राज्यातील लाखो तरुणांच्या उज्वल भविष्यावर पाणी फिरवले गेले आहे. या प्रकाराचा निषेध करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथील तरुण रस्त्यावर उतरले. त्यांनी कंत्राटी निर्णयाच्या विरोधात शासन निर्णयाच्या कागदांची होळी केली अन् आक्रोश व्यक्त केला आहे.

              कुठल्याही स्थितीत आपल्याला यश मिळायला हवे, यासाठीच्या तयारीला विद्यार्थी लागले आहेत. गावागावांतील अभ्यासिका फुल्ल झाल्या आहेत. पण आता शासनाच्या कंत्राटी पद्धतीच्या शासन निर्णयाने त्यांना अभ्यास करण्याचे सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

            राज्यात या विषयावरून आंदोलन तीव्र झाले आहे. गावागावांत त्याचे लोण पसरू लागले आहेत. चंद्रपुरातही या निर्णयामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे अभ्यासिकेत अभ्यास करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी शासनाने काढलेल्या कंत्राटी शासन निर्णयाची होळी केली. जोपर्यंत शासनाकडून हा निर्णय मागे घेतला जात नाही. तोपर्यंत आमचा विरोध अधिक आक्रमकपणे मांडला जाईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

परीक्षा फी अवाढव्य वाढविली आता कंत्राटीचा निर्णय..

           राज्यात विविध विभागांची जम्बो भरती निघाली आहे. याकरिता अनेक पदांच्या परीक्षा झाल्या आहेत. तर अनेक पदांच्या परीक्षा सुरू आहेत. विविध विभागांच्या जाहिरातीही प्रसिद्ध होत आहेत. सध्या सुरू असलेल्या परीक्षांचे शुल्क मागासवर्गीयांसाठी ९०० रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी एक हजार रुपये ठेवण्यात आले आहे.

            आधी परीक्षा शुल्क वाढवून सामान्य घरांतील विधार्थ्यांचे कंबरडे मोडले आहे. शुल्क वाढवल्यानंतर यापुढील शासकीय पदभरती कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असल्याचा निर्णय शासनाने काढला आहे. त्यामुळे या दोन्ही निर्णयाचा चौफेर विरोध होत आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनात शिवसेना व कॉँग्रेसनेही पुढाकार घेत गोंडपिपरीत तीव्र आंदोलन केले.  

             शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, राजू झाडे, उपनगराध्यक्ष सारिका मडावी, नगरसेवक यादव बांबोळे, नगरसेवक वनिता वाघाडे, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष निलेश संगमवार आदी आंदोलनात सहभागी झाले होते.